ठाणे स्थानक परिसरात विक्रेत्यांचे अतिक्रमण

दीड वर्षांपूर्वी महापालिकेच्या आयुक्तपदाचा भार स्वीकारताच, ठाणे शहर फेरीवालामुक्त करण्याची घोषणा करून लागलीच मोहीम छेडणारे संजीव जयस्वाल यांची प्रशासन आणि शहरावरील पकड ढिली झाल्याचे दिसून येत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ठाणे स्थानक परिसरात विक्रेते व फेरीवाल्यांनी आपल्या पथारी पसरण्यास सुरुवात केली असून सॅटिसवरही पादचाऱ्यांची अडवणूक सुरू झाली आहे. महापालिकेत नुकत्याच एका मोठय़ा पदावर विराजमान झालेल्या बडय़ा पदाधिकाऱ्याच्या आशीर्वादाने हे सगळे घडत असतानाही पालिका आयुक्त जयस्वाल यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असा नावलौकिक असणारा ठाणे रेल्वे स्थानक परिसर प्रवाशांसाठी कोंडीमुक्त असावा यासाठी महापालिकेने गेल्या वर्षभरात सातत्याने प्रयत्न सुरू केले. फेरीवाल्यांचे अतिक्रमण असलेल्या जुन्या ठाणे स्थानक रस्त्याचा रुंदीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेताना या भागातील अतिक्रमणांवर जोरदार कारवाई करण्यात आली. टी.चंद्रशेखर यांच्यानंतर बेकायदा बांधकामांविरोधात महापालिकेच्या इतिहासात ही सर्वात मोठी कारवाई कारवाई मानली जात होती. स्थानक रस्त्यांचे रुंदीकरण करत असताना या भागातील पदपथ, रस्ते अडविणाऱ्या बेकायदा फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेण्यात आली होती. पालिकेच्या या कारवाईबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त करत काही ठिकाणी जल्लोशही साजरा केला होता. परंतु, अल्पावधीतच स्थानक परिसर पुन्हा बकाल होऊ लागल्याने ठाणेकरांचा अपेक्षाभंग झाला आहे.

स्थानक परिसरात रस्ता रुंदीकरणाची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर पालिकेने परिसराच्या नियोजनाकडे दुर्लक्ष केल्याने फेरीवाल्यांनी मिळेल ती जागा पटकवायला सुरुवात केली आहे. पूर्वीपेक्षाही अधिक संख्येने फेरीवाले सॅटिस आणि स्थानक परिसरात पाहायला मिळत आहेत. पालिकेत एका मोठय़ा पदावर नुकताच विराजमान झालेल्या एका पदाधिकाऱ्याने तर फेरीवाल्यांना मोकळे रान मिळेल अशीच व्यवस्था करून ठेवल्याची उघड चर्चा आहे. रेल्वे स्थानकलगतचा परिसर या नेत्याचा, तर जांभळी बाजार परिसर एका गुंडाचा अशी हप्तेबाजीची वाटणीही पद्धतशीररीत्या करण्यात आली आहे. स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी या भागात खासगी सुरक्षारक्षक एजन्सीची नेमणूक करण्याची घोषणा मध्यंतरी जयस्वाल यांनी केली होती. तसेच स्थानक परिसरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण थेट आयुक्त कार्यालयात उपलब्ध होईल अशी व्यवस्था केली जाणार होती. जयस्वाल यांच्या या दोन्ही घोषणा फुसका बार ठरल्या आहेत.

आयुक्तांचा दरारा घटला?

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून हप्तेबाजी करत महिन्याला लाखो रुपयांचा मलिदा कमविण्यात या भागातील काही राजकीय नेते आणि गुंड नेहमीच अग्रभागी राहिले आहेत. ठरावीक महापालिका अधिकाऱ्यांची साथ लाभत असल्याने फेरीवाल्यांना या भागात जणू मोकळे रान मिळत असल्याचे चित्र असते. जयस्वाल यांनी काही महिन्यांपूर्वी गुंड, राजकीय नेते, अधिकारी आणि फेरीवाल्यांची अभद्र साखळी मोडून काढत असल्याचे वातावरण निर्माण केले होते. मात्र, आयुक्तांची जरब आता कमी झाल्याचे चित्र आहे.