वसई रेल्वे स्थानकातील फेरीवाल्याच्या दोन मुलींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करताना थेट राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. दर्शना पवार (१५) आणि वर्षां पवार (१८) अशी या दोन मुलीची नावे असून राज्य स्तरीय स्पर्धा जिंकल्यानंतर पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत त्यांची निवड झाली आहे.

दर्शना आणि वर्षां पवार या दोन सख्ख्या बहिणी असून त्यांचे वडील वसई रोड रेल्वे स्थानकात किरकोळ वस्तूंची विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. घरात नृत्याची कसलीच पाश्र्वभूमी नसताना तसेच योग्य प्रशिक्षणाचा अभाव असताना त्यांनी आपली नृत्यकला जोपासली. त्या दोघी नृत्यामध्ये कुशल असून अनेक पारितोषिके पटकावली आहेत. गेल्या वर्षी स्पोर्ट्स डान्स फेडरेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत दर्शना व वर्षां यांना प्रथम पारितोषिक मिळाले होते. तर या वर्षी पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी एकूण ८०० मुलींमधून या दोघी बहिणींची निवड झाली आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वतीने दोन्ही बहिणींच्या या कामगिरीची दखल घेताना त्याचा सत्कार केला.