फेरीवाल्यांना हटविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा नवा प्रयोग

ज्या यंत्रणेने फेरीवाल्यांना हटवयाचे असते; ते पालिका अधिकारी, कर्मचारी आणि पोलीसच फेरीवाल्यांना रस्त्यावर बसण्यासाठी बळ देत आहेत. या फेरीवाल्यांकडून हप्तेखोरी करीत आहेत, अशी टीका मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. या दोन्ही यंत्रणांकडून शहरातील उग्ररूप धारण करणारा फेरीवाल्यांचा प्रश्न कायमचा मिटणार नाही. मुजोर, गुंड प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी कल्याण-डोंबिवलीत ‘बाऊन्सर’चा (धट्टेकट्टे सुरक्षारक्षक) प्रयोग  करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी दिली.

कल्याण पश्चिम, डोंबिवली रेल्वे स्थानक भागात तीन महिने बाऊन्सर नेमून फेरीवाल्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. खासगी सुरक्षा मंडळाकडे फेरीवाल्यांना हटविण्याचे काम द्यायचे. या मंडळाचे बाऊन्सर फेरीवाल्यांना हटवतील. मुजोर ठेकेदारांचे साहित्य सुरक्षा ठेकेदाराचे कामगार त्यांच्या वाहनात जप्त करतील. या कामासाठी सुरक्षा ठेकेदाराला पालिकेकडून फेरीवाल्यांना हटविण्याच्या कामाचे पूर्णाधिकार देण्यात येतील. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो पालिका हद्दीतील नऊ रेल्वे स्थानकांच्या हद्दीतील फेरीवाल्यांच्या बंदोबस्तासाठी लागू करण्यात येईल, असे घरत यांनी स्पष्ट केले.फेरीवाला हटाव पथकातील कामगारांच्या सातत्याने बदल्या करण्यात येतील. डोंबिवलीतील ग प्रभाग फेरीवाला हटाव पथकाचे प्रमुख संजय कुमावत यांची तातडीने बदली करण्याची मागणी महापौर राजेंद्र देवळेकर, नगरसेवक दीपेश म्हात्रे, वामन म्हात्रे यांनी केल्याने, कुमावत यांची तातडीने बदली करण्याचे आश्वासन घरत यांनी दिले. फेरीवाल्यांच्या विरुद्ध दररोज पालिका कर्मचारी कारवाई करीत आहेत. ‘मिलिटरी आणली तरी आम्ही हटणार नाही’ अशी आक्रमक भूमिका फेरीवाल्यांनी घेतली आहे, असे नगरसेवक मंदार हळबे यांनी सांगितले.

नगरसेवकाला एक कोटीची नोटीस

गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना नगरसेवक व युवा सेनेचे अध्यक्ष दीपेश म्हात्रे, शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्यासह समर्थकांनी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला. फेरीवाल्यांच्या सामानाची मोडतोड केली. यामुळे संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी एक ‘डमी’ फेरीवाला उभा करून, त्याला फिर्यादी करून सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर गुन्हे रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करून घेतले. एवढी तत्परता पोलीस पादचाऱ्यांकडून फेरीवाल्यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींची घेतात का, असा प्रश्न सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. फेरीवाल्यांना पुन्हा मारहाण होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा भाग म्हणून पोलिसांनी सेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांना १ कोटी हमीची नोटीस पाठवली आहे. फेरीवाल्यांना दीपेश म्हात्रे यांनी पुन्हा मारहाण केली, त्यांच्या सामानाचे नुकसान केले तर म्हात्रे यांनी पोलिसांकडे एक कोटी रुपये भरावेत, अशा आशयाची ही नोटीस आहे.

पोलिसांचा जाहीर निषेध

फेरीवाल्यांना हटविण्याबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद असून पोलीस फेरीवाल्यांना हटविणाऱ्या नगरसेवकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका सेनेच्या नगरसेवकांनी केली. पोलीस, पालिका प्रशासनाचा निषेध करीत महासभा फेरीवाल्यांचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत कायमची तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पोलिसांचा जाहीर निषेध

फेरीवाल्यांना हटविण्याबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद असून पोलीस फेरीवाल्यांना हटविणाऱ्या नगरसेवकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका सेनेच्या नगरसेवकांनी केली. पोलीस, पालिका प्रशासनाचा निषेध करीत महासभा फेरीवाल्यांचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत कायमची तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.