फेरीवाला संघटनांसोबतच्या बैठकीनंतर जयस्वाल यांची भूमिका

महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यास झालेल्या मारहाणीनंतर संपूर्ण शहरातील फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेणाऱ्या महापालिका प्रशासनाला फेरीवाला ही समाजाची गरज असल्याचा साक्षात्कार झाला आहे. महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांच्या नियमनासाठी आता विविध संघटनांसोबत विचारविनिमय सुरू केला आहे. अशाच एका बैठकीदरम्यान आयुक्त संजीव जयस्वाल यांनी फेरीवालामुक्त ठाणे करण्याची प्रशासनाची कधीच भूमिका नव्हती, असे वक्तव्य करत फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीचा पुनरुच्चार केला. प्रशासनाने अचानक घेतलेल्या या मवाळ भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संदीप माळवी यांना झालेल्या मारहाणीनंतर प्रशासनाने फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. स्वत जयस्वाल आणि वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरून फेरीवाले हटविण्याचे काम करत असले तरी महापालिका पथकाची पाठ वळताच पुन्हा फेरीवाल्यांचे जथ्थे स्थानक परिसरात मांड ठोकत असल्याचे चित्र ठाणेकरांसाठी सवयीचे बनले आहे. यामुळे नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षांनी या कारवाईला नियोजनाचे वावडे असल्याची टीका केली होती. या पाश्र्वभूमीवर जयस्वाल यांनी फेरीवाल्यांच्या नियोजनासाठी र्सवकष धोरण तयार करण्याची तयारी म्हणून मंगळवारी फेरीवाला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची व वाहतूक पोलिसांची बैठक आयोजित करण्यात आली होती.