ठाणे, कळवा तसेच मुंब्रा भागातील रस्ते आणि पदपथांवरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे ठाणेकर हैराण झाल्याने महापालिकेच्या हेल्पलाइनवर तक्रारींचा ओघ येऊ लागला आहे. गेल्या काही महिन्यांत महापालिकेच्या हेल्पलाइनवर फेरीवाला, अनधिकृत फलकांवर कारवाई करण्याकरिता २९४ तक्रारी आल्या आहेत. मात्र, यावर अजिबात कारवाई झालेली नाही.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून फेरीवाले वाढले असून या फेरीवाल्यांनी मुख्य चौक, रस्ते आणि पदपथ अक्षरश: गिळंकृत केल्याचे चित्र आहे. फेरीवाल्यांविरोधात ठाणेकरांना तक्रार नोंदविता यावी म्हणून ठाणे महापालिकेने काही महिन्यांपूर्वी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली. तसेच शहरातील फेरीवाले आणि अनधिकृत फलकांविरोधात तक्रार नोंदविण्याचे आवाहनही केले होते. गेल्या सात महिन्यांत या हेल्पलाइनवर २९४ तक्रारी आल्या असून सर्वाधिक तक्रारी फेरीवाल्यांविरोधात आहेत, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
मध्यंतरी, ठाणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या गोखले मार्गावर काही गुंड पाच ते दहा हजार रुपये घेऊन फेरीवाल्यांना बसवितात. मात्र या फेरीवाल्यांवर कारवाई करायची नाही म्हणून महापालिका प्रशासन फेरीवाला धोरणाचा बाऊ करीत असल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेनेने केला होता. तसेच फेरीवाला शुल्कातून मिळणारे उत्पन्न नको, आधी फेरीवाल्यांवर कारवाई करा, असा आग्रहही शिवसेनेने धरला होता. यातूनच ठाणे शहर फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडल्याचे उघड होते.
नौपाडा, वर्तकनगर तक्रारीत आघाडीवर..
ठाणे महापालिकेच्या हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारीमध्ये नौपाडा आणि वर्तकनगर भाग आघाडीवर आहे. सात महिन्यांत नौपाडा भागातून ८२, तर वर्तकनगर भागातून ९० तक्रारी आल्या असून त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात फेरीवाल्यांविरोधात तक्रारी आल्या आहेत. कोपरी भागातून चार, उथळसर भागातून २६, वागळे भागातून १४, रायलादेवी भागातून दोन, माजिवाडा-मानपाडा भागातून १९, कळवा भागातून आठ, मुंब्रा भागातून नऊ आणि इतर भागांतून सहा तक्रारी आल्या असून त्यामध्ये फेरीवाल्यांच्या तक्रारीचे प्रमाण सर्वाधिक आहे, असे सूत्रांनी सांगितले.
नीलेश पानमंद, ठाणे