गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे डोंबिवली शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीजपुरवठा खंडित होणे, अपघात, वाहतूक कोंडी असे प्रकार घडले. त्यातून सावरून जनजीवन सुरळीत झाले असले, तरी झाडांच्या पडझडीमुळे अनेक पक्षी बेघर झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या चार दिवसांत मोठे वृक्ष कोसळून त्यावरील पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त होऊन पक्षी जखमी झाले. जून महिन्यात गेल्या २२ दिवसांत ‘पॉझ’ या प्राणी-पक्षीमित्र संघटनेने ५५ पक्ष्यांची सुटका केली.
रविवारी डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी येथे सायंकाळी एक झाड कोसळले. जुने व विस्तीर्ण अशा या झाडावर गाय बगळा व ढोकरी या प्रजातीचे ३० बगळे होते. पावसात हे झाड पडल्याने या सर्व पक्ष्यांची घरटी नष्ट झाली.  येथील रहिवासी किरण सालियन यांनी पॉझ संघटनेचे नीलेश भणगे यांना तत्काळ दूरध्वनी करून या घटनेची माहिती दिली. नीलेश भणगे व त्यांच्या बचाव संघाचे सहकारी संचित, राज यांनी घटनास्थळी येऊन सर्व पक्ष्यांना ताब्यात घेतले. यापैकी दोन पक्ष्यांचा मृत्यू झाला, तर जास्त जखमी झालेल्या पक्ष्यांवर प्राथमिक उपचार करून त्यांना परळ येथील पशुवैद्यक दवाखान्यात पाठवण्यात आल्याचे भणगे यांनी सांगितले. तसेच अन्य पक्ष्यांना जंगलात सोडण्यात आले असल्याचे ते म्हणाले.