गेल्या अनेक दिवसांपासून उसंती घेतलेल्या पावसाने काल मध्यरात्रीपासून पुन्हा जोर धरल्याचे पाहायला मिळाले. या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. तर मध्यरेल्वे सेवा देखील विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे चाकरमान्यांचे आणि रेल्वे प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, ठाण्यात २ ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळली असून काही सोसायट्यांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी भरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने काल मध्यरात्रीपासून जोर दाराला आहे. पावसामुळे ठाण्यातील काही सखोल भागात पाणी साचले असून रस्त्यांवरील खड्डे आणि साचलेले पाणी यामुळे वाहतूकीवर काहीसा परिणाम झालेला दिसून आला. या साचलेल्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

शहरातील पावसामुळे ठाण्यातील पोखरण रोड येथे २ झाडं रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तसेच कळवा येथील सह्याद्री सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. तर, मुंब्र्यातील काकानगर येथे देखील दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. पावसाने सकाळपासूनच जोर धरल्यामुळे चाकरमान्यांचे आणि रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. या जोर धरलेल्या पावसामुळे मध्यरेल्वे सेवा देखील विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. या दरम्यान, मध्यरेल्वे १५ ते २० मिनटे उशिराने धावत आहे. तर ठाण्यात गेल्या २४ तासांत ६६ मिमी पावसाची नोंद झाली असून गेल्या तासाभरात १५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.