दिव्या-कळव्यापाठोपाठ मुख्य शहरातील रस्त्यांचीही चाळण

‘सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय’ या चालीवर रचण्यात आलेले मुंबईतील खड्डय़ांची ‘पोलखोल’ करणारे गीत समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत असताना, ठाणेकरांवरही आता असेच ‘रडगाणे’ गायची वेळ आलेली आहे. पावसाच्या पहिल्या तडाख्यात दिवा-कळवा या शहरांतील रस्त्यांची झालेली चाळण चर्चेचा विषय ठरू पाहात असतानाच आता खुद्द ठाण्यातील रस्तेही खड्डय़ात गेले आहेत. चुकीच्या कार्यपद्धतीमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहेच; पण भर पावसाळय़ात मलनि:सारण तसेच जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पालिका प्रशासनानेच रस्ते खोदल्याचे चित्र आहे. घोडबंदर रोड, नौपाडा तसेच वर्तकनगर परिसरातील रस्त्यांचीही अवस्था वाईट असून या मार्गावरून  जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे,  या खड्डय़ांकडे पालिकेचे लक्ष न गेल्याने ठाणेकरांचा आता प्रशासनावरचा ‘भरवसा’ उडू लागला आहे.

घंटाळी चौक : पेव्हर ब्लॉकची ठिगळे

तीन पेट्रोल पंपजवळ असलेल्या घंटाळी चौकातील रस्त्यावर असलेले खड्डे पावसामुळे तुंबले आहेत. या पाण्याने तुंबलेल्या खड्डय़ातच सोमवारी पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू होते. पावसातच हे पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू असल्याने ते किती काळ तग धरणार, असा सवाल आता विचारण्यात येत आहे.

नितीन चौक : रस्ता नव्हे, पाण्याची डबकी

लोकमान्यनगर, वागळे इस्टेट परिसरातील नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या नितीन चौकातच मोठय़ा प्रमाणात खड्डे आहेत. सायंकाळच्या वेळी वाहनांच्या प्रचंड गर्दीतून वाट काढणाऱ्या वाहनचालकांसाठी हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत.   सावरकरनगर, कामगार चौकात खड्डय़ांमुळे रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे.

गोखले रोड : खोदकामाच्या दिरंगाईचा फटका

गोखले रस्त्यावर फेब्रुवारी महिन्यापासून मलनि:सारण प्रकल्पासाठी काम सुरू होणार असल्याचा फलक लावण्यात आला होता. मात्र फेब्रुवारी ते जून या कालावधीत या ठिकाणी कोणतेही काम झाले नाही. पावसाने जोर धरल्यावर जून महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांत या ठिकाणी रस्ते खोदून काम सुरू करण्यात आले. सध्या गोखले रस्त्यावर ठिकठिकाणी या कामासाठी रस्ते खोदण्यात आले असून भर पावसात काम सुरू असल्याने रस्त्यांची अक्षरश: दुर्दशा झाली आहे.  पालिकेच्या दिरंगाईचा फटका नागरिकांना बसत आहे.

रस्त्यांची चाळण

कळव्यातील रस्त्यांचीही खड्डय़ांमुळे चाळण झाली आहे. ऐरोली रस्त्याकडून कळवा पुलावर चढतानाच रस्त्यावर असलेल्या खड्डय़ांमुळे नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. पारसिकनगर भागात बांधकाम व्यावसायिकांनीच रस्त्यावर टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

कोलशेत रोड : तकलादू मुलामा

पाच महिन्यांपूर्वीच पालिकेने येथे रस्त्या खोदून जलवाहिनी टाकण्याचे काम केले होते. उशिरा का होईना काम पूर्ण झाले. आणि रस्त्याचे डांबरीकरणही करण्यात आले. मात्र, अवघ्या पाच महिन्यांत खड्डे रस्त्यात की रस्त्यात खड्डे असा प्रश्न पडत आहे. या संपूर्ण डांबरीकरणावर पावसाने आपला हात फिरविल्याने या रस्त्याचे बांधकाम किती सुमार दर्जाचे होते आणि कंत्राटदाराचे डांबरामुळे काळे झालेले हात ठाणेकरांसमोर आले आहेत.

कापूरबावडी नाका : मलमपट्टीही कुचकामी

कापूरबावडीच्या रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. तात्पुरते मलमपट्टी करून खड्डे बुजवले जातात, परंतु पुन्हा स्थिती तशीच राहते. त्यामुळे आता या त्रासाची सवयच झाली आहे, अशी प्रतिक्रिया रहिवासी हेमंत वाईरकर यांनी दिली.

वाघबीळ नाका : दुसऱ्या पालिकेचे पाप

काही दिवसांपूर्वीच घोडबंदर मार्गावर मीरा-भाईंदर पालिकेने जलवाहिनीचे काम हाती घेतले होते. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावर मातीची भर तशीच ठेवण्यात आली. याचा फटका आता या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना होत आहे. चिखल व खड्डे तयार झाले आहेत. शहराच्या मुख्य रस्त्याचीही दयनीय अवस्था आहे.