प्रवाशांना भिवंडी वळण रस्त्याचा आधार; कल्याण, कसारा, शहापूर परिसरातील प्रवाशांची कोंडी

नोकरदार मुंबईच्या दिशेने येत असतानाच वासिंद रेल्वे स्थानकाजवळ दुरांतो एक्सप्रेसचे डबे घसरल्याने कल्याण, डोंबिवली, ठाण्याच्या पुढे जाणाऱ्या प्रवाशांचे मंगळवारी सकाळी हाल झाले. त्यात संततधार पावसाची भर पडली. डोंबिवलीत सकाळी नऊ वाजता लोकलमध्ये बसलेले प्रवासी दादरला साडेअकरा वाजता पोहचले. कसाऱ्याहून सीएसटीच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक पूर्ण ठप्प झाल्याने कल्याण, डोंबिवलीपुढील प्रवाशांना कर्जतकडून येणाऱ्या, कल्याणहून सुटणाऱ्या लोकलवर अवलंबून राहावे लागले.

दुरांतो घसरल्याने उपनगरी रेल्वेचे वेळापत्रकच कोलमडून पडले. सकाळपासून लोकल पाऊण ते एक तास उशिराने धावत होत्या. कल्याण, डोंबिवली, कोपर, ठाणे रेल्वे स्थानकांवर ठरलेल्या वेळेत लोकल न पोहचल्याने फलाटांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. बऱ्याच वेळाच्या अंतराने येणाऱ्या लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी उसळत होती.

लोकलची गर्दी पाहून आपण मुंबईला पोहचू शकत नाही म्हणून अनेक लोकल प्रवाशांनी भिवंडी वळण रस्त्यापर्यंत रिक्षाने प्रवास करून तिथून मिळेल त्या वाहनाने ठाणे व पुढचा प्रवास करणे पसंत केले. भिवंडी बा’ा वळण रस्त्याच्या दिशेने धावणाऱ्या रिक्षा प्रवासी खचाखच भरून धावत होत्या. काही जाणकार प्रवाशांनी ओला, उबर रिक्षांचा आधार घेऊन मुंबई, ठाणे गाठणे पसंत केले. काही प्रवाशांनी लोकलचा विस्कळीतपणा पाहून घरी जाऊन आपल्या खासगी वाहनाने मुंबईतील ठिकाण गाठणे पसंत केले. घरात गणपती, त्यात गौरींचे आगमन मंगळवारी असल्याने वेळेत कामावर जाऊन लवकर घरी परतूया असा विचार करून कामावर निघालेल्या नोकरदार महिला वर्गाने फलाटावरील लोकलचा रागरंग पाहून घरी परतणे पसंत केले. घाटकोपरच्या पुढे मुसळधार पाऊस पडत असल्याने कोणत्याही क्षणी लोकल सेवा ठप्प होण्याचे लघुसंदेश चाकरमान्यांच्या भ्रमणध्वनीवर फिरत होते. त्यामुळे बहुतांशी प्रवासी रस्त्यात अडकून पडण्यापेक्षा घरच्या दिशेने परतत असल्याचे दिसून येत होते.

सकाळी नऊ वाजता डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकल पकडली. लोकल वारंवार थांबत असल्याने व मुसळधार पावसामुळे नऊची लोकल दादरला पोहचायला तब्बल साडे अकरा वाजले. एक्सप्रेसचे डबे घसरल्याने लोकल खोळंबल्या होत्या.

डॉ. सीमा पाटील, प्रवासी

लोकल सेवा पूर्ण विस्कळीत झाल्याने नोकरदारांचे सर्वाधिक हाल झाले. लोकलने मुंबई गाठणे शक्य नसल्याने अनेकांनी रिक्षांचा आधार घेऊन भिवंडी बाह्य़ वळण रस्त्याने ठाणे, मुंबई आणि शहापूर, कसाराकडे जाणे पसंत केले. कल्याणच्या पुढे आसनगावच्या दिशेने लोकल सेवा विस्कळीत झाल्याने बहुतेक प्रवाशांनी मंगळवारी या रस्ते मार्गाचा उपयोग केला.

अजय क्षीरसागर, प्रवासी