कोंडीच्या भीतीने ठाणे-डोंबिवलीकर घरातच; रस्ते-रेल्वे स्थानकांत शुकशुकाट

मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने रात्री उशिरापासून जोर धरत संपूर्ण ठाणे जिल्ह्याला झोडपून काढत ठाण्यासह विविध शहरांतील जनजीवन विस्कळीत केले. सोसाटय़ाच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर अशा जिल्ह्यांतील सर्वच शहरांतील सखल भाग जलमय झाले होते. तर पावसाच्या माऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष पडझडीच्या घटनाही घडल्या. मंगळवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यानंतर राज्य सरकारने शाळा-महाविद्यालयांना बुधवारी सुट्टी जाहीर केल्यानंतर नोकरदारांनीही बुधवारी घराबाहेर पडण्याचे टाळले. त्यामुळे पावसाचा जोर जास्त असला तरी, त्याचा मोठा फटका बसल्याचे जाणवले नाही.

ठाणे जिल्ह्यात मंगळवारी दुपारपासून बुधवारी दुपापर्यंत तब्बल १०५४ मिमी पावसाची नोंद झाली. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात ३१८० मिमी पावसाची नोंद झाली असून गतवर्षीच्या सरासरीपेक्षा यंदा ७४२ मिमी जास्त पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली असून शहरांतील नालेही दुथडी भरून वाहू लागल्याचे बुधवारी दिसून आले.

ठाण्यासह अन्य सर्वच शहरांत बुधवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले होते. ठाणे शहरातील गोखले रोड, मानपाडा, वृंदावन, नितीन कंपनी, वागळे इस्टेट अशा भागांत काही प्रमाणात पाणी साचले होते. हिरानंदानी मेडोज परिसर, वसंतविहार, कापूरबावडी परिसरात पाणी साचल्याने गुडघ्यापर्यंत साचलेल्या पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागत होता. या भागातून जाणाऱ्या टीएमटी, बेस्ट बस, रिक्षा पाण्यातून मार्ग काढत असल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. उपवन तलावातील पाण्याची पातळी वाढल्याने तलावातील पाणी रस्त्यावर वाहत होते. वागळे इस्टेट तसेच शहराच्या अन्य भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. कल्याण शहरातदेखील सारखीच परिस्थिती दिसून येत होती. मुसळधार पावसामुळे कल्याणमधील काळा तलाव भागात पाणी साचले होते. पालिकेच्या आपत्कालीन पथकाने या भागातील पाणी निचरा करून दिला. शिवाजी चौक, संतोषी माता रस्ता, बेतुरकरपाडा, कोळसेवाडी, काटेमानिवली, तिसगाव परिसरातील काही भागांत पाणी तुंबले होते. डोंबिवलीत रेल्वे स्थानक परिसर, महात्मा फुले रस्ता या भागांत पाणी साचले होते.

दरम्यान, मंगळवारी पावसाचा एकंदर नूर पाहून राज्यशासनासह विविध खासगी कंपन्यांनी बुधवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली होती. अवघ्या २० दिवसांपूर्वी, २९ ऑगस्ट रोजी पावसाने उडवलेली दाणादाण लक्षात घेऊन अनेकांनी बुधवारी घराबाहेर पडण्याचे टाळले.  त्यामुळे सकाळपासूनच सर्व शहरांतील रस्ते ओस पडल्याचे चित्र होते. प्रवाशांनी सदैव गजबजलेल्या ठाणे रेल्वे स्थानकासह अन्य स्थानकांवरही प्रवाशांची तुरळक गर्दी होती.

रेल्वे स्थानकांत सामसूम

पावसाच्या माऱ्यामुळे उपनगरी रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली नसली तरी, तिचा वेग मंदावला होता. परंतु, २९ ऑगस्ट रोजीच्या पावसाचा अनुभव ताजा असल्याने बुधवारी अनेकांनी घरातच राहणे पसंत केले. त्यामुळे बुधवारी सकाळीही ठाणे रेल्वे स्थानकात शुकशुकाट होता.  रेल्वेच्या अप आणि डाउन मार्गावरील दिशेकडील लोकल इतर दिवसांच्या तुलनेत रिकाम्या धावत होत्या.

ट्रान्स हार्बर विस्कळीत

घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेत बिघाड झाल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूकही तासाभरासाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. मात्र, तासाभरात ही वाहतूक सुरळीत करण्यात आली.

नवरात्रीच्या उत्साहावर पाणी

गुरुवारपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवाच्या खरेदीला मात्र पावसाचा जबर फटका बसला. पावसामुळे विविध ठिकाणच्या बाजारपेठांमध्येही पाणी शिरल्याने विक्रेत्यांची धांदल उडाली. कल्याण, डोंबिवली शहरातील बाजारात गावाकडची माती, खुरासणीची पिवळी फुले, झेंडूच्या फुलांचे हार व पत्री आदी सामग्री घेऊन येणाऱ्या ग्रामीण भागातील महिला बुधवारी तुरळक प्रमाणात दिसून आल्या. त्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला. नवरात्रोत्सव सुरू होण्याच्या पूर्वसंध्येलाच देवीची मूर्ती मंडपात विराजमान करण्याच्या मंडळांच्या प्रथेतही बुधवारच्या पावसाने खंड पाडला.