आरोग्य व्यवस्थेत उपचारांसाठी अपरिहार्य असलेल्या रक्ताचा पुरवठा करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी नियमित रक्तदान करणे आवश्यक आहे. अधिक महिन्यात काहीतरी दान करण्याचा प्रघात आहे आणि रक्तदानाशिवाय अन्य चांगला पर्याय नाही. कारण रक्तदान केल्याने आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो. म्हणूनच जागतिक रक्तदिन आणि अधिक आषाढानिमित्त ठाण्यातील कै. वामनराव ओक रक्तपेढीने जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन केले आहे. ठाणे-पालघर जिल्ह्य़ातील रक्त संकलन आणि पुरवठा करणाऱ्या या प्रमुख केंद्राचा परिचय..

स ध्याच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या जीवनात अपरिहार्य ठरलेल्या ताण-वैद्यकीय शास्त्र कितीही प्रगत झाले तरी अद्याप कृत्रिमरीत्या मानवी रक्त तयार करता आलेले नाही. अपघातग्रस्त, कॅन्सर रुग्ण अथवा डेंग्यू-मलेरियासारख्या साथीच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना उपचारांसाठी रक्ताची आवश्यकता असते. थॅलेसिमिया आणि हिमोफेबिया रुग्णांना नियमित रक्त लागते. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेत नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवतो. आवश्यक तेवढा रक्त पुरवठा व्हावा यासाठी नागरिकांनी अधिक प्रमाणात पुढे येऊन रक्तदान करणे आवश्यक आहे. त्यासाठी  विविध स्वयंसेवी संस्था जनजागृतीपर मोहिमा तसेच ठिकठिकाणी वेळोवेळी शिबिरे आयोजित करीत असतात. ठाणे परिसरात २००७ पासून कार्यरत असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीची वामनराव ओक रक्तपेढी या संदर्भात मोलाचे कार्य करीत आहे. अधिकाधिक नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी या संस्थेच्या वतीने सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. जागतिक रक्तदान दिन तसेच अधिक महिन्यानिमित्त संस्थेने प्लेटलेटस् या रक्त घटक दानासाठी मोठय़ा प्रमाणात नावनोंदणीचे आवाहन केले आहे. कारण गेल्या काही वर्षांत डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथीच्या रोगाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या कैकपटींनी वाढली आहे. त्यांना तसेच कॅन्सर रुग्णांना मोठय़ा प्रमाणात प्लेटलेटस् लागतात. रक्तदान तीन महिन्यातून एकदा करता येते. प्लेटलेटस्चे तसे नसते. महिन्यातून दोनदाही प्लेटलेटस् दान करता येते. मात्र ते पाच दिवसांपेक्षा अधिक काळ साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे रक्तपेढीतर्फे प्लेटलेटस् दात्यांची सूची बनविण्याचे काम सध्या सुरू आहे.
अत्याधुनिक सुविधा
ठाण्यात विष्णूनगर विभागातील या पेढीत अत्याधुनिक पद्धतीने रक्त संकलन करण्याची व्यवस्था आहे. एकावेळी कमाल दीड हजार रक्तपिशव्या येथे संकलित केल्या जाऊ शकतात. रक्ताचे विघटन करणारी ‘अफेरासिस’ ही स्वयंचलित यंत्रणा संस्थेकडे आहे. सस्थेतर्फे मुंबई, ठाणे तसेच पालघर परिसरात वर्षभरात सुमारे १२५ शिबिरे घेतली जातात. आतापर्यंत संस्थेतर्फे ८५० शिबिरे घेण्यात आली आणि तब्बल २८ हजार रक्तपिशव्या संकलित झाल्या. दरवर्षी साधारण सात हजार जण रक्तपेढीत येऊन रक्तदान करतात. कुणी स्वत:च्या वाढदिवशी, लग्नाच्या वाढदिवशी अथवा आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वर्षांतून किमान एकदा रक्तदान करतो. अशा नियमित रक्तदात्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न संस्थेतर्फे केला जात आहे. रक्तदानामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात, हे नागरिकांच्या मनावर बिंबविण्यासाठी संस्थेतर्फे उपक्रम राबविले जातात.
विभागीय रक्त संक्रमण केंद्र
२०१३ मध्ये या रक्तपेढीने पाच हजार रक्त पिशव्यांचे संकलन केले. त्यामुळे शासनातर्फे या संस्थेला विभागीय रक्त संकलन केंद्राचा दर्जा देण्यात आला. सध्या ठाणे तसेच पालघर या दोन्ही जिल्ह्य़ातील ही सर्वात मोठी रक्तपेढी आहे.
रक्त साठवण केंद्र
ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्य़ांचा भौगोलिक विस्तार खूप मोठा आहे. त्यामुळे अनेकदा ठाण्यातून रक्त आणण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये दहा ठिकाणी संस्थेतर्फे रक्त साठवण केंद्र (ब्लड स्टोअरेज सेंटर) उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णांना वेळेत रक्त पुरवठा होऊ शकेल. जवळपास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही संकलन केंद्रे असतील.
संपर्क- कै. वामनराव ओक रक्तपेढी, घंटाळी मित्र रोड, विष्णूनगर, नौपाडा, ठाणे (प). दूरध्वनी- २५३८५२४८.

ना नफा-ना तोटा  
‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर या रक्तपेढीचे काम चालते. शासनाने रक्त पिशवीसाठी १४५० रुपये ही प्रमाणित किंमत ठरवली आहे. मात्र या रक्तपेढीत  १३०० रुपयांना रक्त पिशवी दिली जाते. शासकीय रुग्णालय अथवा कळवा येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील रुग्णांना रक्तपिशवी एक हजार रुपयांना दिली जाते. याशिवाय थॅलेसिमिया आणि हिमोफेलिया रुग्णांना विनामूल्य रक्त दिले जाते. लवकरच या रक्तपेढीत थॅलेसिमिया केंद्र सुरू करण्याची संस्थेची योजना आहे. प्रत्यक्ष रक्तदात्याला रक्ताची गरज लागली तर त्याला विनामूल्य रक्तपिशवी दिली जाते. त्याने त्याचे कार्ड अन्य व्यक्तीसाठी वापरले तर रक्तपिशवीसाठी तीनशे रुपये सूट दिली जाते. रक्तपेढी चालविण्याासाठी वार्षिक दीड कोटी रुपये खर्च येतो. नफा कमविणे हा संस्थेचा उद्देश नसल्याने येणारी तूट भरून काढण्यासाठी देणग्या गोळा कराव्या लागतात. समाजातील दानशूरांनी यथाशक्ती या प्रकल्पासाठी मदत करावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
फ्रेंडशिप आणि व्हॅलेंटाईन
रक्त संकलन आणि वितरणाबरोबरच रक्तदानाची चळवळ अधिक विस्तारण्यासाठी संस्थेतर्फे विशेष प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून व्हॅलेंटाईन डे तसेच फ्रेंडशिप डेच्या दिवशी अधिकाधिक जणांनी रक्तदान करावे म्हणून विशेष मोहीम राबवली जाते. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. ‘प्रिय व्यक्तीसाठी रक्तदान करा’ किंवा ‘डोनेट ब्लड फॉर युवर अन्नोन फ्रेंड’ या घोषवाक्यांच्या आधारे संस्थेतर्फे या दिवशी रक्तदानाचे आवाहन केले जाते. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. त्याचप्रमाणे जागतिक महिला दिनी खास महिलांसाठी रक्तदान शिबीर भरविले जाते. कारण विविध कारणांमुळे रक्तदान करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण अवघे आठ टक्के आहे. रक्तदान चळवळीत महिलांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांचे समुपदेशन केले जाते. त्याचप्रमाणे रक्तदान चळवळीत तरुणांनी मोठय़ा प्रमाणात सहभागी व्हावे म्हणून निरनिराळ्या महाविद्यालयांमध्ये रक्तपेढीच्या वतीने उपक्रम राबविले जातात. ठाण्यातील निरनिराळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही रक्तपेढी दाखविण्यात आली आहे. भविष्यातील रक्तदाते घडविणे हा त्यामागचा हेतू आहे.

प्रशांत मोरे