नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी होण्यास २७ गावचे ग्रामस्थ मात्र निरुत्साही

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत २७ गावांचा पुन्हा नव्याने समावेश झाला आहे. या गावांचाही आता विस्तार व्हावा, येथील नागरिकांना शहरी भागातील नागरिकांशी एकरूप करण्याच्या दृष्टीने डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेसोबत ग्रामीण भागातील तीन स्वागत यात्रा जोडण्याचा प्रयत्न गणेश मंदिर संस्थानने सुरू केला आहे. याविषयी अद्याप बोलणी सुरू असल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे. असे असले तरी ग्रामीण भागातील संस्था मात्र या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होण्यास निरुत्साही असल्याचे दिसून येत आहे.

हिंदू नववर्षांची सुरुवात गुढीपाडवा या सणापासून होते. या दिवसाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवलीने नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात १८ वर्षांपूर्वी केली. अठरा वर्षांपूर्वीचा काळ हा वेगळा होता, सणाला नागरिक एकत्र येत असत, पारंपरिक खेळ खेळत असत. त्याला नंतर व्यापक स्वरूप येऊन विविध संस्थांचा सहभाग त्यात वाढत गेला. डोंबिवली शहरापासून तीन-चार किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या ग्रामीण भागातील जनतेलाही यात सहभागी होता यावे, या स्वागत यात्रेत ग्रामीण जनतेचाही समावेश असावा म्हणून पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट व आनंद वारकरी संप्रदाय पंथ यांच्यावतीने स्टार कॉलनी गणेश मंदिर येथून निघणारी स्वागत यात्रा डोंबिवलीतील चार रस्ता येथे गणेश मंदिर संस्थानच्या स्वागत यात्रेत सहभागी होत असे. तसेच मिलापनगर व पी अ‍ॅन्ड टी कॉलनी परिसरातील नागरिकांची स्वागत यात्राही चार रस्ता येथे यात्रेत सहभागी होत होती. परंतु एक तपानंतर गणेश मंदिर संस्थान केवळ स्वतची प्रसिद्धी करत असून मान मिळत नसल्याने त्यांच्यात मतभेद झाले आणि या स्वागत यात्रा दुभंगल्या गेल्या.

मिलापनगर व पी अ‍ॅण्ड टी कॉलनी येथील नागरिक एकत्र जमून अथर्वशीर्ष व काही सांस्कृतिक कार्यक्रम करून नववर्षांचे स्वागत करतात. तर पिंपळेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने ग्रामीण भागात वेगळी स्वागतयात्रा काढण्यात येते. यंदा मात्र महापालिकेत ही गावे नव्याने समाविष्ट झाली आहेत, ग्रामीण व शहरी भागातील तरुणाईला हाताशी घेत स्वागत यात्रेत तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी गणेश मंदिर संस्थानने या स्वागत यात्रेत आलेली दुरी मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टने पुन्हा एकदा डोंबिवली स्वागत यात्रेत सहभागी व्हावे तसेच मिलापनगर व पी अ‍ॅण्ड टी कॉलनीतील नागरिकांनीही या यात्रेत पहिल्यासारखे सहभागी व्हावे या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.

अद्याप आमच्यासोबत गणेश मंदिराची कोणतीही बोलणी झालेली नाहीत. डोंबिवलीतील स्वागत यात्रा ग्रामीण भागातही फिरावी. ग्रामीण भागातील जनतेला तीन ते चार किमी अंतर कापून तेथे जाणे शक्य नाही. सण घरातही साजरा करावयाचा असल्याने नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. यामुळे आम्ही डोंबिवलीच्या स्वागत यात्रेत गेली सात वर्षे सहभागी होत नाही. आम्हाला आमचा मान मिळावा तसेच स्वागत यात्रा ग्रामीण भागातही फिरल्यास आम्ही नक्कीच त्यात सहभागी होऊ.

– प्रकाश म्हात्रे, पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट

पूर्वीसारखा नागरिकांचा सहभाग आता नसतो. शिवाय दोन-तीन किमी अंतर कापून गणेश मंदिर संस्थानच्या यात्रेत सहभागी व्हायचो, ते केवळ स्वागत यात्रेचे स्वागत करण्यासाठी. परंतु हल्ली केवळ या कामासाठी कोणी तेथे जाण्यास तयार नसल्याने आम्ही हनुमान मंदिर परिसरातच आवर्तने व लहान मुलांचे कार्यक्रम करून नववर्षांचे स्वागत करतो. शिवाय स्वागत यात्रेत पुन्हा सहभागी होण्याविषयी अद्याप संस्थेशी कोणतेही बोलणे झाले नाही.

– रवि म्हात्रे, पी अ‍ॅण्ड टी कॉलनीतील महावैष्णव मारुती सेवा समिती