सुटीत मुलांचे छंद पुरवायचे, ही पालकांची आद्य जबाबदारीच. पण मुलं वर्गात छंद जोपासत असताना पालकांनाही त्यांचे छंद पुरे करण्याची योजना सध्या डोंबिवलीत भलतीच यशस्वी ठरली आहे. त्यांच्यासाठी खास पाककला, नृत्य आणि चित्रकला वर्ग भरवले जात आहेत आणि त्याला जोरदार प्रतिसादही मिळत आहे.
मुलांनी छंदवर्गात रममाण व्हावे आणि पालकांनी निव्वळ बसून राहावे, ही पद्धत आम्हाला खटकली. त्यामुळे पालकांचे छंद पुरे करण्याचे ठरवले गेले. म्हणूनच आज डॉल केक, जेली केक, फ्रुट केक, नो बेक (चीझ) केक, रेनबो केक आदी २० प्रकार दिवसभरात बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते, असे आयोजक अनुजा भानुशाली यांनी सांगितले. लहानपण काही कारणांनी धकाधकीत गेले, अशी पालकांची खासगीत तक्रार कधी तरी ऐकायला मिळते, पण मोठे झाल्यावर छंद जोपासायला नको का, हा प्रश्न आहे. आम्ही त्याच्यावर हे छानसं उत्तर शोधलं इतकंच, असे आयोजिका निशा सिंग म्हणाल्या.
नावड ते आवड..
मुलांना नाचणीच्या भाकरी आवडत नाही. मग कुकीजचा नवीन पौष्टिक पदार्थ बनवा, असे आम्ही त्यांना सांगतो. पौष्टिक आहार त्यांच्या आवडत्या पदार्थातून मिळतो आणि हा केक शिकण्यासाठी महिलाही जास्त उत्सुक असतात. काही तरी नवीन शिकायला मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो.

नृत्याचे प्राथमिक शिक्षण महिलांनी देण्यात येते. चित्रकलेचेही तसेच आहे. आवड आहे पण काही करता येत नाही, अशा परिस्थितीत चित्रकला स्पर्धा घेण्यात येते. त्यात पालक आवडीने सहभागी होतात.
– धनश्री सुर्वे, आयोजिका

चित्र सुंदर येण्यासाठी मुलानेच चित्रकलेचा क्लास लावण्याचा सल्ला मला माझ्या मुलानेच दिला आणि तो मी अमलात आणला.
– प्रमोद पवार, पालक

शर्मिला वाळुंज, डोंबिवली