घरदार उद्ध्वस्त करणाऱ्या बार संस्कृतीवर अंकुश आणण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारचे कायदे, नियम तयार केले जात आहेत. परंतु आपल्या देशाची भावी पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या हुक्का पार्लर, या समाजाला अत्यंत संथगतीने पोखरत असलेल्या प्रवृत्तीकडे मात्र शासनाचे कोणतेही लक्ष नाही. या हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासाठी कायद्यातही ठोस उपाययोजना नाही शिवाय कोणत्या यंत्रणेने त्यावर कारवाई करायची याबाबतही स्पष्ट निर्देश नसल्याने तरुण पिढी व्यसनाधीन बनविणारी ही संस्कृती दिवसेंदिवस फोफावू लागली आहे आणि हा एक चिंतेचा विषय ठरत आहे.

भाईंदर पूर्व येथील एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड घातल्यानंतर कारवाई करण्यासाठी येणाऱ्या मर्यादा, त्यात चालणारे अनैतिक प्रकार आदी गंभीर प्रकार प्रकाशझोतात आले आहेत.

डान्स बारवर बंदी घालून शासनाने बारमध्ये होणारी पैशांची उधळपट्टी, त्यातून वाढणारी गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्याचा प्रयत्न केला. बारमालक त्यालाही बधत नाही असे पाहून शासनाने गेल्याच वर्षी आणखी एक कायदा संमत केला. बारमध्ये काम करणाऱ्या महिलांची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांच्याकडून अश्लील काम करवून घेणाऱ्या बारमालकांना पाच लाखांपासून ते २५ लाख रुपयांपर्यंतचा दंड तसेच तीन वर्षे शिक्षेची तरतूद केली. या कायद्याने बारमधील अनैतिक प्रकार किती प्रमाणात रोखले गेले, असा प्रश्न उपस्थित होत असला तरी या कायद्यामुळे पोलिसांचे हात बळकट होऊन त्यांना बारमालकांवर कारवाई करण्यासाठी कायद्याचे मजबूत हत्यार हाती आले आहे आणि नाही म्हणायला बारमालकांमध्येही या कायद्याची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.

बारसंस्कृती विरोधात शासन अशा तऱ्हेने पावले टाकत असली तरी पावसाळ्यात उगवणाऱ्या भूछत्र्यांप्रमाणे दररोज निर्माण होत असलेल्या हुक्का पार्लर संस्कृतीला रोखण्यासाठी मात्र शासनाकडून कोणतेही ठोस उपाय योजले जात नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी हुक्का पार्लरचालक दिवसेंदिवस मस्तवाल होत असून त्यांची हुक्का पार्लर दिमाखाने सुरू राहात आहेत आणि कोवळ्या वयाची पिढी मात्र तंबाखूच्या व्यसनात गुरफटली जात आहे. या हुक्का पार्लरवर कडक कारवाई करण्यासाठी कायद्यात फारशी ठोस तरतूद नसल्याने हुक्का पार्लरचालकांवर केवळ अदखल पात्र गुन्हा नोंदविण्यापलीकडे पोलीस फार काही कारवाई करू शकत नाहीत. त्यामुळे हुक्का पार्लरचे चालक आपला व्यवसाय पुन्हा दिमाखात सुरू करत आहेत.

सुमारे वर्ष दीड वर्षांपूर्वी बाजारात हुक्का पेन नावाची हुबेहूब पेनसारखी दिसणारी वस्तू मुलांना अगदी सहज मिळत असल्याचे उघडकीस आले होते. एका शालेय विद्यार्थिनीने ही बाब उघडकीस आणल्यानंतर खळबळ उडाली होती. पेनाच्या आकाराच्या या हुक्क्यात सुंगधी द्रव्याची रिफील वापरली जाते. यातील सुगंधी द्रव्याची जागा तंबाखूजन्य द्रव कधी घेतो हे मुलांच्या ध्यानातही येत नाही आणि मग या हुक्का पेनची सवय मुलांना जडू लागते. परंतु या हुक्का पेनवरही आजपर्यंत कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. मुलांना लागलेली हुक्का पेनची सवयच मग पुढे प्रत्यक्षात हुक्का ओढण्यात परावर्तीत होते. हुक्क्याच्या व्यसनाची पहिली पायरी म्हणून हुक्का पेनकडे पाहिले जाते. त्यामुळे या मुळावरच घाव घालण्याची गरज असताना आजही हुक्का पेन सर्वत्र सहजपणे उपलब्ध होत आहे.

तारुण्याच्या उंबरठय़ावर असलेली पिढी सध्या हुक्का पार्लरकडे आकर्षित होत आहे. खरे म्हणजे हुक्का पार्लरमध्ये देण्यात येणाऱ्या हुक्क्यात हर्बल अथवा स्ट्रॉबेरी, अननस अशा फळांचा सुगंध असलेला छोटा तुकडा ज्याला केक असे म्हटले जाते तो दिला जातो आणि हुक्क्याद्वारे त्याचा धूर ओढला जातो.

परंतु मीरा-भाईंदरमध्ये जागोजागी उघडलेल्या हुक्का पार्लरमधून सर्रासपणे तंबाखूजन्य पदार्थ हुक्क्यामधून देण्यात येतात. अल्पवयीन, महाविद्यालयीन तरुण-तरुणी या हुक्का पार्लरमध्ये अक्षरश: गर्दी करत असतात. हुक्का पार्लरमधील वातावरण मुळात नशा करण्यासाठी पोषक असे तयार करण्यात आलेले असते. दिव्यांचा मंद प्रकाश, ठेका धरायला लावणारे, बेभान करणारे संगीत यात तरुण-तरुणी भुलले जातात. परंतु या सर्व प्रकारांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच आज उपलब्ध नाही.

मुळात बहुतांश हुक्का पार्लर अनधिकृत इमारतींमधून उभारण्यात आले आहेत. महानगरपालिकेकडून त्यांना व्यवसाय परवाना कसा दिला जातो, हाच खरा प्रश्न आहे. महापालिकेने या अनधिकृत इमारतींवर कारवाई केली तर बारप्रमाणेच हुक्का पार्लरचे देखील समूळ उच्चाटन होईल. परंतु पालिका अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याने अनधिकृत इमारतींवर कारवाई होत नाही आणि त्याचा फायदा हुक्का पार्लरवाले घेत आहेत. हुक्का पार्लरमधील हुक्क्यात कोणते पदार्थ वापरले जात आहेत याची वेळोवेळी तपासणी करण्याची आवश्यकता आहे. परंतु ही तपासणी करायची कोणी याबाबत शासकीय यंत्रणांमध्येच गोंधळ आहे. अन्न  आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार ही तपासणी त्यांच्या अखत्यारित येत नाही आणि पोलिसांना अशी तपासणी करायचे अधिकार नाहित. ते तंबाखूजन्य पदार्थाचा वापर केल्याप्रकरणी फार तर संबंधितांवर गुन्हा दाखल करू शकतात. तोदेखील कायद्यातील तरतुदीनुसार अदखलपात्र गुन्हाच आहे. त्यामुळे कारवाई केल्यानंतर अवघ्या काही तासांत संबंधित व्यक्ती जामिनावर सुटतात. हुक्का पार्लरची जागा सील करण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत त्यामुळे दुसऱ्याच दिवसापासून पुन्हा त्या ठिकाणी हुक्का पार्लर सुरू केले जातात. त्यामुळेच तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यात जखडवणारी ही कीड समूळ नष्ट करण्याची गरज असून शासनाने याचा गांभीर्याने विचार करून याबाबत कडक कायदे निर्माण करण्याची खरी गरज आहे.

प्रकाश लिमये