ठाण्यातील धर्मवीरनगर तुळशीधाम परिसरात दुखापतग्रस्त झालेल्या घोडय़ांवर उपचार करण्याचे टाळून त्यांना टांग्याला बांधण्याचे क्रौर्य घोडमालक करीत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. या परिसरात जखमी होऊन पडलेल्या घोडय़ाच्या अवस्थेविषयी ठाण्यातील प्राणिमित्रांनी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र तक्रार दाखल झाल्यानंतरही या घोडय़ावर कोणत्याही प्रकारचे उपचार सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

घोडा सध्या उघडय़ावर असून त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. अशा जखमी घोडय़ाला टांग्याला बांधून त्याच्याशी क्रौर्याने वागण्याचा प्रकार त्याचा मालक करीत असल्याचा आरोप तक्रारदार सुनिश कुंजू यांनी केला आहे.

ठाण्यातील तुळशीधाम विभागातील तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या जवळील ग्रीनवुड कॉम्प्लेक्सच्या समोरील रस्त्यावर एक वर्षांपासून तीन घोडय़ांना उघडय़ावर बांधण्यात येत असून तेथील वस्तीत त्या घोडय़ांचा मालक राहतो. या घोडय़ांना टांग्याला जुंपण्यासाठी वापर होत असला तरी त्यांची काही दिवसांपासून आवश्यक देखभाल आणि निगा राखली जात नव्हती. पावसाळ्यामध्ये या घोडय़ांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. टांगा ओढून तसेच वारंवार मारहाण केल्यामुळे या घोडय़ांच्या अंगावर मोठय़ा जखमा झाल्या आहेत. या जखमांच्या वेदनांनी ऑक्टोबर महिन्यात यापैकी एक घोडा जागच्या जागी जमिनीवर कोसळला. या भागात सकाळी फिरायला जाणारे सामाजिक कार्यकर्ते अश्विन आघोर यांना या घोडय़ांच्या वेदना लक्षात आल्या. त्यांनी यासंबंधीची माहिती ‘प्लँट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी’  कार्यकर्त्यांने दिली.

तक्रारीनंतरही कारवाईला दिरंगाई

या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज दिला. मात्र ही हद्द नव्याने बनवण्यात आलेल्या चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे सुनिश यांना चितळसर पोलीस ठाणे गाठावे लागले. ५ ऑक्टोबर रोजी त्यांनी पोलिसांना तक्रार अर्ज दाखल करून या प्रकरणी लक्ष देण्याची विनंती केली. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात घोडय़ाचा मालक शफिक मोहम्मद शेख याच्याविरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबच्या कायद्यानुसार तसेच मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटला तरी या घोडय़ाच्या उपचाराची कोणतीच व्यवस्था अद्याप झाली नसल्यामुळे या घोडय़ांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे, तर पोलिसांनी यासंबंधी कारवाई करण्यात येईल, असे लेखी उत्तर प्राणिमित्रांना दिले आहे. या उत्तरापलीकडे कारवाई होत नसल्याचा संताप प्राणिमित्रांनी व्यक्त केला आहे.

घोडय़ाच्या उपचारांची व्यवस्था अद्याप झालेली नाही. शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या घोडय़ाची पाहणी होण्याबरोबरच त्याच्यावर उपचार होण्याची गरज आहे. अन्यथा या घोडय़ाचा प्राण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या संदर्भात तात्काळ उपचारांची सोय करणे गरजेचे आहे.

सुनिश सुब्रमहण्यम कुंजू, संस्थापक सचिव, पॉज