ठाण्यातील स्वमग्न मुलांसाठी बागकाम चिकित्सा उद्यान * ३२ प्रजातींच्या वनस्पतींची लागवड
भोवतालच्या घडामोडींकडे लक्ष नसलेल्या स्वत:च्याच विश्वात मग्न असलेल्या स्वमग्न (ऑटिस्टिक) मुलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन अलिप्ततावादी असतो. मात्र, स्वत:च्या विश्वात असतानाही निसर्गाच्या जतनाचे व्रत घेत ठाण्यातील विग्ज संस्थेच्या स्वमग्न मुलांनी लुईसवाडी येथील पालिका शाळेच्या परिसरात ‘बागकाम चिकित्सा उद्यान’ (हॉर्टिकल्चर थेरपी) साकारले आहे. आंबा, चिकू, कडुलिंब, तुळस, काकडी, वांगी अशा विविध प्रकारच्या ३२ झाडांची येथे लागवड करण्यात आली असून त्यासाठी ही मुले व त्यांचे प्रशिक्षक गेल्या चार महिन्यांपासून मेहनत घेत होते. त्यातील अनेक झाडांवर फळधारणाही झाली असून मंगळवारी औपचारिक उद्घाटनानंतर या मुलांच्या मेहनतीचे फळ सर्वाना पाहायला मिळणार आहे.

‘विग्ज’ संस्थेच्या माध्यमातून लुईसवाडी येथील महापालिकेच्या शाळेच्या परिसरामध्ये गेल्या आठ वर्षांपासून स्वमग्न मुलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र चालवले जाते. शालेय शिक्षण पूर्ण झालेली २० ते ३२ वर्षांची दहा मुले या केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतात. काही महिन्यांपूर्वी बागकामतज्ज्ञ अंजना देवस्थळी यांनी त्यांना ‘बागकाम चिकित्सा’ उद्यानाची ओळख करून दिली. त्यानंतर संस्थेच्या मदतीने विद्यार्थ्यांनी शाळेच्या बाजूला असलेल्या एका कोपऱ्यात झाडांची लागवड केली. तेव्हापासून दररोज संध्याकाळचा एक तास ही मुले या झाडांच्या सान्निध्यात घालवत असून त्यांची निगा राखण्याचा प्रयत्न करतात. हा उपक्रम हळूहळू वाढवून त्यातून येणारे उत्पन्न ही त्या केंद्रातील मुलांना देण्याचा विचार असल्याची माहिती संस्थाचालक डॉ. विद्या लोणकर यांनी दिली. या उपक्रमाला माजी महापौर अशोक वैती यांनी प्रोत्साहन दिले असून या उपक्रमाचे उद्घाटन मंगळवारी त्यांच्या हस्ते होणार आहे.

बागकाम चिकित्सा म्हणजे काय?
निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या व्यक्तीची वाढ चांगली होते. आजारी रुग्णांना निसर्ग आणि वनस्पतींच्या सान्निध्यात ठेवल्यास त्यांच्या आरोग्यात सुधारणा होते. निर्मितीचा आनंद देण्याबरोबरच व्यक्तिमत्त्व घडवणाऱ्या या उपचार पद्धतीला ‘बागकाम चिकित्सा’ पद्धती म्हणून ओळखली जाते. अमेरिकेसारख्या देशांमध्ये या उपचार पद्धतीचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात असून भारतामधील मोठय़ा रुग्णालयांमध्ये ही चिकित्सा पद्धत अवलंबली जाते. ठाण्यात पहिल्यांदाचा हा उपक्रम राबवला जात असून केंद्रातील मुलांच्या मनावर आणि वागण्यावर त्यांचे सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहेत, अशी माहिती बागकामतज्ज्ञ अंजना देवस्थळी यांनी दिली.