जिभेचे चोचले पुरवणे म्हणजे काय तर चमचमीत, मनाला आवडेल ते खाणं. या खाण्यात पौष्टिकपणा किंवा पोट भरण्याची क्षमता कमी असेलही, पण त्याच्या चवीनेच मन आणि पोट तृप्त होते. अशाच पदार्थामध्ये दाबेली, फ्रँकी यांचा समावेश करता येईल. पोटभर खायचे नसेल तर पावभाजी खाण्याऐवजी खवय्ये नेहमीच १० ते १५ रुपयाला मिळणारी दाबेली खाणे पसंत करतात. दाबेली हा गुजराती खाद्यप्रकार असला तरी आता महाराष्ट्रात तो बऱ्यापैकी रुजला आहे. ठाणे परिसरात अनेक ठिकाणी दाबेली मिळते. काही जण त्याला मिनी पावभाजी असेही गमतीने म्हणतात. तर दुसरीकडे पोळी किंवा चपाती-भाजी खाण्यापेक्षा आजकाल फ्रँकी खाण्याची फॅशन युवा पिढीमध्ये रूढ झाली आहे. त्यामुळे गरमागरम कच्छी दाबेली आणि पोटभर तसेच ४० प्रकारांत बनविण्यात येणारी चमचमीत फ्रँकी खाण्यासाठी खवय्ये असणारे ठाणेकर ‘डीकेज दाबेली कॉर्नर’ला आवर्जून भेट देतात.
कच्छ या प्रदेशातून दाबेलीची निर्मिती झाली असली तरी मराठमोळ्या वडापावसारखेच दाबेली आता मुंबई-ठाणेकरांचे हक्काचे खाद्यपदार्थ बनली आहे. चमचमीत असणाऱ्या दाबेलीमध्ये अमुल दाबेली, अमुल चीज दाबेली, जैन दाबेली, जैन चीज दाबेली आदी दाबेली या डीकेज फूड कॉर्नरमध्ये खायला उपलब्ध आहे. मात्र दुकान छोटे असल्याने येथे उभे राहून दाबेली व फ्रँकीचा आस्वाद घ्यावा लागतो. डीकेज फूड कॉर्नरची स्थापना १७ वर्षांपूर्वी कानजी बारोट यांनी केली. आता हे कॉर्नर त्यांचा मुलगा दिनेश बारोट चालवत आहेत. मात्र हा कॉर्नर चालवत असताना त्यांनी काळानुसार त्यात बदल करून ४० प्रकारच्या विविध फ्रँकीज खाण्यासाठी सज्ज केल्या आहेत. त्यामुळे तरुणांनी येथे अधिकाअधिक गर्दी करून आपली पसंती दर्शवली आहे. शिवाय येथील चीज, न्युडल्स, मेयोनीज यासारख्या पदार्थामुळे जिभेला पाणी सुटते. या परिसरातून जात-येत असताना बटर तसेच दाबेलीच्या भाजीचा सुवास पसरलेला असतो. त्यामुळे पाच मिनिटे थांबून दाबेली खाण्याचा मोह वृद्धांपासून तरुणांपर्यंत कोणालाही आवरता येत नाही.
गुजराती भाषेत दाबेली म्हणजे दाब देणे. त्याचे कारणही तसेच असून यात तयार करण्यात येणारी भाजी पूर्ण बारीक करून त्यावर चिरलेली कोथिंबीर, खोबरे आणि लालचुटूक असणाऱ्या डाळिंबाचे दाणे टाकण्यात येतात. त्यामुळे विविध पदार्थानी सजवलेली ही रंगीत भाजी समोर आल्यावर खावीशी वाटली नाही तरच नवल. दाबेलीची भाजी दिवसातून तीन वेळा बनविण्यात येते. ग्राहकांना ताजे खायला मिळावे यासाठी डीकेज फूड कॉर्नरचे मालक दिनेश बारोट नेहमीच प्रयत्नशील असतात. दाबेलीचा हा मसाला जरी दुकानात रेडीमेड उपलब्ध असला तरी डीकेज फुड कॉर्नरक डे हा मसाला घरी जयार केला जातो. त्यामध्ये मिरची पावडर, काळी मिरी पारडर आदी प्रकारचे जिन्नस वापरून तेहा मसाला बनवत असल्याचे दिनेश बारोट यांनी सांगितले. वर्षांनुवर्षे ग्राहक टिकून राहावेत म्हणून ते विशेष काळजी घेतात. त्यासाठी त्यांच्याशी चर्चाही करतात. डीकेज फास्ट फूड कॉर्नर असलेले हे दुकान डीकेज दाबेली कॉर्नर या नावानेच प्रसिद्ध आहे.
दाबेलींप्रमाणेच येथे विविध प्रकारच्या फ्रँकी मिळतात. त्यात रेग्युलर फ्रँकी, जैन फ्रँकी, न्युडल्स फ्रँकी असे तीन मुख्य प्रकार आणि त्यात ४० विविध उपप्रकार ते बनवतात. रेग्युलर फ्रँकीमध्ये व्हेज फ्रँकी, सेझवान फ्रँकी, चीज सेझवान फ्रँकी, पनीर सेझवान फ्रँकी, मेयॉनीज सेझवान फ्रँकी, मश्रुम शेजवान, चीज पनीर शेझवान, चीज मेयॉनीज शेझवान, पनीर मयोनीज, पनीर मश्रुम आदी फ्रँकीची नावे ऐकल्यानंतर खवय्याच्या तोंडाला पाणी सुटते. यामध्ये न्युडल्स आणि जैन फ्रँकीचेही विविध प्रकार खाण्यासाठी उपलब्ध आहेत. या सर्व फ्रँकी ३० रुपयांपासून ११० रुपयांपर्यंत उपलब्ध असून हे फूड कॉर्नर ठाणेकरांच्या विशेष पसंतीचे आहे. यामध्ये वापरले जाणारे मसाले घरचेच असून शेझवान चटणीही घरीच तयार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. जैन फ्रँकीमध्ये कांदा, लसूण आदी जिन्नस चालत नसल्याने त्यांच्यासाठी अशी वेगळी चटणी बनवली जाते.
गरम दाबेली किंवा फ्रँकी खायला दिल्यानंतर एक सेकंदाचा धीरही खवय्यांना आवरता येत नाही. त्यामुळे तो पदार्थ खाण्याइतपतही थंड होऊ न देता ग्राहक खायला सुरुवात करतात, असेही त्यांनी हसत हसत नमूद केले. चवीने खाणे जिभेचे चोचले असून अधिकाधिक स्वादिष्ट खायला घालणे हे आमचे कर्तव्य असून ‘चमचमीत खा आणि मस्त जगा’ असा सल्लाही त्यांनी ग्राहकांना दिला आहे. दुकान छोटे असले तरी येथे कटाक्षाने स्वच्छता राखली जाते. दाबेली आणि फ्रँकीव्यतिरिक्त येथे चायनीज भेळही खाण्यासाठी उपलब्ध आहे. चीज, बटर, न्युडल्स, कांदा हे सर्व जिन्नस पदार्थामध्ये टाकल्याने पदार्थ अधिक चविष्ट बनतो.

डीकेज् कॉर्नर
टीजेएसबी बँकेच्या समोर, बी-केबिन परिसर, ठाणे (प)
वेळ- सकाळी १० ते संध्याकाळी ८