बरनाथ पूर्वेला उभी असलेली ‘धनश्री महिला पतपेढी’ लाखो रुपयांच्या भागभांडवलासह सहकार क्षेत्रात पाय रोवून घट्ट उभी राहिली आहे. सध्या संस्थेकडे मोठय़ा संख्येने भागधारक, स्वत:चे कार्यालय, मोठा कर्मचारी वर्ग आहे, तसेच सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविल्याबद्दल काही पुरस्कारही एव्हाना संस्थेस मिळाले आहेत. अंबरनाथमधील काही गृहिणींनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या संस्थेचा उल्लेख आदर्श असा केला जात आहे.
महिलांनी महिलांच्या आर्थिक हिताची जपणूक करण्यासाठी एखादी संस्था पुढे मोठे स्वरूप धारण करते आणि व्यापक दृष्टिकोनातून कार्यरत राहाते, ही उल्लेखनीय अशी बाब म्हणायला हवी. १९९० मध्ये सहकार भारतीचे एक अधिवेशन डोंबिवली येथे आयोजित केले होते. या अधिवेशनातून प्रेरणा घेत अंबरनाथ पूर्वेला राहणाऱ्या अनुराधा पोळ यांनी ही पतपेढी सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. श्रीमती पोळ यांनी त्यांचा मनोदय काही ठरावीक मैत्रिणींच्या कानावर घातला आणि सर्वानी होकार देत काम सुरू केले. सुरुवातीला केवळ महिलांसाठीच पतपेढी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पतपेढीसाठी भागधारक म्हणून शहरातील महिलांच्या सहकार्याची अपेक्षा होती, कारण त्या वेळेस किमान ३०० सभासद व २५००० रुपये भागभांडवल सुरुवातीला असावे अशी सहकार खात्याची अट होती. त्यावर तोडगा म्हणून अनुराधा पोळ व त्यांच्या मैत्रिणींनी अंबरनाथमध्ये विभागवार बैठका सुरू करण्याचे सत्र आरंभले.
अंबरनाथमधील साई सेक्शन, कानसई सेक्शन, वडवली विभाग अशा वेगवेगळ्या भागांत बैठका घेत महिलांना या पतपेढीच्या स्थापनेमागची भूमिका स्पष्ट केली. या बैठकांना बऱ्यापैकी यश मिळाले. ३०० सभासद व २५ हजार भागभांडवल तयार झाले व पतपेढीच्या स्थापनेसाठी पहिली बैठक १४ जानेवारी १९९१ ला सुरू झाली. २०० सभासद महिला या बैठकीला उपस्थित होत्या. या पहिल्या यशानंतर ३१ मार्च १९९१ पासून खऱ्या कामास सुरुवात झाली. या दिवशीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला शिक्षक मतदारसंघाच्या आमदार संजीवनी रायकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आबाजी थत्ते हे मान्यवर उपस्थित होते. पतपेढीकडे सुरुवातीला कार्यालय नव्हते, म्हणून अनुराधा पोळ यांचे पती व पतपेढीचे सल्लागार अरविंद पोळ यांनी त्यांच्या घराखालची जागा पाच वर्षांसाठी मोफत वापरण्यास दिली. पतपेढीने वाटचाल करण्यासाठी डोंबिवलीच्या कांचनगौरी महिला पतपेढीचे सहकार्य घेतले आहे. सुरुवातीच्या काळात महिलांना एकत्र आणण्यासाठी संक्रांत व चैत्र गौरीचे हळदीकुंकू, भोंडला आदी सण साजरे करत महिलांना वेळोवेळी साद घातली. ज्या काळात सोने तारण एवढे प्रचलित नव्हते तेव्हाच थोडय़ा पैशांची आवश्यकता असलेल्या महिलांचे कानातले गहाण ठेवून कर्ज देण्यात आल्याचे पोळ यांनी सांगितले.
३०० सभासदांहून दुसऱ्याच वर्षी ६०० सभासद व ७० हजार भागभांडवल झाले. मात्र, आज ६००० सभासद आणि निव्वळ २० लाखांचा नफा एवढी पत या पतपेढीने कमावली आहे. आजही महिलाच पतपेढी चालवत असून १५ महिलांचे संचालक मंडळ व व्यवस्थापकासह ६ कर्मचारी आहेत. संस्थापक संचालिका अनुराधा पोळ यांच्याबरोबरीनेच सध्या प्रज्ञा राहतेकर अध्यक्षा आहेत, तर उपाध्यक्षा दीपा राहतेकर, सचिव मनीषा कोपरकर कार्यभार सांभाळत आहेत.
अत्याधुनिकतेकडे पाऊल
पतपेढी सातत्याने सहकार खात्याकडून ‘अ’ वर्ग मिळवत असून केवळ भागधारक महिलांच्या विश्वासाच्या बळावरच हे शक्य झाले आहे. सध्या संस्था कात टाकत असून पतपेढी अद्ययावत व संगणकीकृत झाली आहे. येथील साहाय्यक निबंधकांचेही वेळोवेळी सहकार्य मिळाल्याने आम्ही यशस्वी वाटचाल करू शकलो. गरजू महिलांना आजर्प्यत ८ कोटी बारा लाखांचे कर्ज वाटले आहे. २००८ सालापासून महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर पतपेढीला मार्गदर्शन करत आहेत. पतपेढीच्या या कामकाजामुळे २०११ साली महिला पतपेढय़ांच्या भरलेल्या अधिवेशनात उत्कृष्ट पतपेढीचे पारितोषिक मिळाले असून २०१२ साली सहकार भारतीचे मासिक सहकार सुगंधतर्फे घेण्यात आलेल्या अहवाल स्पर्धेत पारितोषिक मिळाले आहे, असे संस्थापक -संचालिका अनुराधा पोळ यांनी सांगितले. पतपेढीच्या विश्वासार्हतेबद्दल सांगताना उपाध्यक्षा दीपा राहतेकर म्हणाल्या की, पूर्वी महिलांसाठी असलेली पतपेढी आम्ही चार वर्षांपूर्वी पुरुषांसाठीही खुली केली. तेव्हा भागधारक झालेल्या शंकर नवरे यांना दुसऱ्या पतपेढीतून आपले भागभांडवल काढून ते या पतपेढीत आले; परंतु कौटुंबिक कारणांमुळे त्यांना अंबरनाथ सोडावे लागले. तेव्हा गहिवरलेल्या अवस्थेत त्यांनी पतपेढीला निरोप दिला. या वेळी त्यांनी भावुक होत चांदीचा दिवा व समई हे भेट म्हणून दिले.
रौप्य महोत्सवानिमित्त कार्यक्रम, संकल्प
यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून यानिमित्त रांगोळी, वक्तृत्व, मंगळागौरी आदी स्पर्धा घेण्यात आल्या, तर प्रत्येकी दहा हजारांप्रमाणे चार गरजू संस्थांना धर्मादाय निधी देण्यात आला आहे. त्याचबरोबर बचत गटाच्या महिलांसाठी मोफत स्टॉल उपलब्ध करून देत त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. तसेच, औद्योगिक क्षेत्रातील महिलांना सहकार व पतपेढी कळावी म्हणून अंबरनाथ उद्योजक संघटनेच्या बरोबरीने येथील महिलांसाठी मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. तसेच, सभासदांना विनामूल्य कार्यक्रम, प्रशिक्षण देण्यात येत असून सभासदांना प्रत्येक सभेत भेटवस्तू देण्यात आल्या असून सर्वात उपयुक्त असा अत्यावशक औषधांचा डबा भेट देण्यात आला. पुढील वाटचालीसाठी रोजची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ करण्याचा मानस असून गृहकर्जही देणार आहोत.

pension for government employees
लेख : सामाजिक कल्याणाकडे दुर्लक्ष
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान