वेगवेगळे झेंडे.. कार्यकर्त्यांची तुडुंब गर्दी.. पक्षांच्या नावाने घोषणाबाजी.. तर, अर्ज भरण्यासाठी पालिकेत उमेदवारांच्या मोठय़ा रांगा.. असे चित्र मंगळवारी अंबरनाथ व बदलापूर या दोन्ही शहरांच्या पालिका परिसरात दिसत होते. एरवी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करणाऱ्या उमेदवारांना मंगळवारी मात्र अर्जदारासारखी रांग लावून वेळेत अर्ज भरण्याची कसरत करावी लागत होती.
येत्या २२ एप्रिल रोजी होणाऱ्या कुळगाव-बदलापूर तसेच अंबरनाथमधील नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. या वेळी अनेकांना पक्षाचे एबी फॉर्म उशिरा मिळाल्याने शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी सगळ्याच पक्षाचे उमेदवार एकाच दिवशी व एकाच वेळी आल्याने निवडणूक केंद्रावर प्रचंड गर्दी झाली. सायंकाळी उशिरापर्यंत हे अर्ज भरण्याचे काम सुरूच होते.
बदलापूरला एकाच वेळी सगळे उमेदवार आल्याने उमेदवारांची मोठी रांग लागली होती. उमेदवारांना तब्बल अर्धा तास रांगेत उभे राहावे लागत होते. तर पालिका परिसरात १४४ कलम लागू असताना अचानक कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. या वेळी येथे मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. शाळेतून सुटलेल्या मोठय़ा बसेस या वाहतूक कोंडीत अडकल्याने विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासही उशीर होत होता.

अंबरनाथमध्ये शिवसेना व भाजपच्या ५७ जणांनी अर्ज भरले, तर ऐन वेळी येथे राष्ट्रवादी व रिपाइं (से) पक्षाची आघाडी झाल्याने त्यांच्या आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज भरले. त्याचप्रमाणे बदलापूरमध्ये ४७ जागांसाठी सेना आणि भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज भरले. काँग्रेसच्या बारा जणांनी, तर राष्ट्रवादीच्या जवळपास तीस जणांनी अर्ज भरले. मनसेच्या उमेदवारांनीही दोन्ही शहरांत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.