प्लास्टिकचा कचरा आणि मद्याच्या बाटल्या वेचून समाजापुढे नवा आदर्श

वसईला लाभलेल्या निसर्गरम्य अशा समुद्रकिनाऱ्यावर येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. मात्र येथे येणारे पर्यटक हे किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेत नसल्यामुळे या किनाऱ्यांवर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे, स्थानिक प्रशासन देखील याकडे कानाडोळा करीत असल्यामुळे याविरोधात नैतिक जबाबदारी म्हणून हंगेरीतील एक महिला दर रविवारी वसईच्या रानगाव समुद्रकिनाऱ्यावरील कचरा उचलून लोकांसमोर एक नवा आदर्श ठेवीत आहे.

देशभरात ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या नावाने ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमा हाती घेण्यात येत आहे. पण आपला परिसर स्वच्छ करण्याचे भान राखणारे अन्य ठिकाणी गेल्यावर मात्र त्याची जबाबदारी टाळताना दिसत आहे. वसईचे समुद्रकिनारे हे याच उदासीनतेचे बळी ठरत आहेत. सध्या उन्हाळी सुट्टय़ांचा हंगाम असल्याने या किनाऱ्यांवर पर्यटक मोठय़ा संख्येने येत आहेत. पण पर्यटकांसोबतच अस्वच्छतेलाही निमंत्रण मिळत आहे. वसई पश्चिमेचा रानगाव समुद्रकिनारा असाच अस्वच्छ  झाला आहे. मात्र निधी आणि माणसांची कमतरता असे कारण देत रानगाव ग्रामपंचायत या किनाऱ्याच्या स्वच्छतेची जबाबदारी झटकत आहे. पण सुझाना फेरारो नामक हंगेरियन महिलेने मात्र स्वत:च्या नैतिक जबाबदारीतून कोणत्याही मदतीविना या किनाऱ्यांच्या स्वच्छतेचे दायित्व स्वीकारले आहे. दर रविवारी सुझाना आपल्या पतीसोबत या किनाऱ्यावरील प्लास्टिक आणि मद्याच्या बाटल्या पिशवीत गोळा करते. विशेष म्हणजे, तिच्या या कामात तिचा तीन वर्षांचा मुलगादेखील सहभाग घेतो.

ग्रामस्थांचाही हातभार

सुझाना फेरारो हंगेरी देशाची नागरिक आहे. तिने लिस्बन या भारतीय माणसाशी लग्न केले असून व्यवसायानिमित्त ते वसई आणि गोवा येथे राहतात. हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात समुद्रकिनारे नाहीत परंतु तलाव आहेत. तेथील नागरिक तलाव अतिशय स्वच्छ ठेवतात. त्यामुळे वसईतील समुद्रकिनाऱ्यावरील ही अस्वच्छता पाहून एक सुज्ञ नागरिक म्हणून तिने हा किनारा स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छतेबाबतची तिची तळमळ पाहून ग्रामस्थांनीही तिला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.