जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांचे प्रतिपादन

अस्मितेच्या प्रश्नावर राजकारण करणे सोडून एकजुटीने विकास कामे केली तरच हिवरे बाजार आणि राळेगण सिद्धीसारखी प्रगती साधता येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी केले. मुरबाड तालुक्यातील रोटरी समूहाच्या वतीने बुधवारी आयोजित पऱ्हे महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात त्या बोलत होत्या. गावकऱ्यांनी दहा टक्के लोकवर्गणी भरली तर उर्वरित निधी जिल्हा प्रशासन देऊन गावातील नादुरुस्त उपसा सिंचन योजना त्वरित कार्यान्वित करण्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी ग्रामस्थांना दिली.

मुरबाड तालुक्यातील पऱ्हे गावात १६ ते ३० डिसेंबर या कालावधीत रोटरीच्या पुढाकाराने महोत्सव भरविण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात अंबरनाथ येथील पी. डी. कारखानीस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर गावात भरविण्यात आले होते. आठवडाभरात विद्यार्थ्यांनी गाव सर्वेक्षण, परिसर स्वच्छतेबरोबरच श्रमदानातून दोन वनराई बंधारे बांधले. त्यानंतरच्या सप्ताहात रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ इस्ट, इनरव्हील क्लब ऑफ अंबरनाथ तसेच रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाअंतर्गत पऱ्हे-कांदळी गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. शिबिरांद्वारे गावकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. सुसंवाद कार्यक्रमाद्वारे पोलीस पाटील, ग्रामसेवक, पोलीस अधिकाऱ्यांचा गावकऱ्यांशी संवाद घडवून आणण्यात आला. गावातील शाळेत इ-लर्निग सुविधा तसेच ग्रंथालय उपलब्ध करून देण्यात आले. यानिमित्ताने परिसरातील महिलांसाठी पाककला स्पर्धाही घेण्यात आली. गावात राबविण्यात आलेल्या या सर्व प्रकल्पांना जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी पऱ्हे ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन तसेच रस्त्याचे भूमिपूजनही करण्यात आले.

सामाजिक उत्तरादायित्वाच्या भावनेतून औद्योगिक कंपन्यांनी रोटरीच्या माध्यमातून ग्रामविकासासाठी पुढाकार घेतल्यास जिल्हा प्रशासन त्याला सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावेळी दिले. स्थानिक आमदार किसन कथोरे, अंबरनाथचे रोटरीचे अध्यक्ष उमेश तायडे, देवेंद्र जैन, दत्ता घावट, स्वप्नील वर्मा, बदलापूर रोटरीच्या डॉ. शकुंतला चुरी, इनरव्हील क्लबच्या नवमी बॉक्सन आदी याप्रसंगी उपस्थित होते.