निवडणूक संपताच पालिका प्रशासनाची तत्परता

ठाणे महापालिका निवडणुकीची आचारसंहिता संपताच बेकायदा बांधकामांविरोधात ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा मोहीम हाती घेतली आहे. बेकायदा बांधकामांचे आगार असणाऱ्या दिवा शहरात गेल्या दोन दिवसांपासून मोठी मोहीम सुरू करण्यात आली असून बुधवारी येथील चार ते पाच चाळींमधील सुमारे ८० पेक्षा अधिक अनधिकृत घरे महापालिकेने जमीनदोस्त केली. त्यामुळे या बांधकामांचे ‘आश्रयदाते’ असलेल्या राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत.

ठाणे महापालिका हद्दीतील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी तसेच विविध विकासकामांकरिता अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा आयुक्त संजीव यांनी गेल्या काही महिन्यांपासून उगारला आहे. ठाणे महापालिका निवडणूक आचारसंहितेमुळे ही कारवाई मध्यंतरी ठप्प होती. परंतु आचारसंहिता संपताच आयुक्त जयस्वाल यांनी या कारवाईस पुन्हा सुरुवात केली आहे. शिळफाटा परिसरातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर पालिकेने आता आपला मोर्चा दिवा शहराकडे वळविला आहे. मंगळवारी ठाणे महापालिकेने ओमकारनगर परिसरातील २०० अनधिकृत घरे तोडली. बुधवारी दातिवली तलाव परिसरातील शिवकृपा, माऊलीकृपा, श्रीकृष्ण कृपा या चाळींमधील सुमारे ८५ घरे पालिकेने तोडली. गुरुवारीही पालिका आणखी काही घरांवर बुलडोझर चालविणार आहे.

केवळ दोन दिवस आधी नोटीस देऊन पालिकेने दिव्यातील घरे तोडण्यास सुरुवात केली. पालिकेच्या या कारवाईमुळे १०० हून अधिक कुटुंबे रस्त्यावर आली असून आता राहायचे कोठे असा प्रश्न त्यांना पडला आहे. ‘आम्ही शास्तीकर भरतो, वीज बिल, पाणी बिल भरतो मग आम्हाला बेघर का केले गेले,’ असा प्रश्न स्थानिकांनी विचारला आहे. ‘न्यायालयाची नोटीस दाखविली जात नाही, तसेच पालिकेने ११३ च्या सव्‍‌र्हेमधील घरे तोडण्याऐवजी सरसकट सर्व घरे तोडण्यास सुरुवात केली आहे,’ असा आरोप संतोष पडय़ार यांनी केला. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमच्या घरांवर कारवाई केली जाऊ नये यासाठी मध्यंतरी आजूबाजूच्या परिसरात आमच्याकडून चौदाशे तिवरांची रोपे लावून घेतली. तरीही कारवाई केली जात आहे, अशा शब्दांत नागरिकांनी रोष व्यक्त केला.

राजकारण्यांना विसर

‘आमच्या घरांवर कारवाई केली जाणार नाही, असे महापालिका निवडणुकीत प्रत्येक उमेदवार सांगत होता. परंतु, आता निवडणूक संपताच सारे संपले!’, अशा शब्दांत मंगेश म्हात्रे यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली. तर बंटी कळकुंबे यांनी मुलांच्या परीक्षांदरम्यान सुरू करण्यात आलेल्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाही सुरू आहेत. रस्त्यावर आमची मुले अभ्यास करत असून आम्ही आता जायचे कुठे,’ असा सवाल त्यांनी केला.