कल्याण-डोंबिवलीतील उमेदवारांचा नवी युक्ती; पालिकेच्या प्रवेशद्वारावर बेकायदा गाळ्याची उभारणी
कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा परिसरात बेसुमार बेकायदा बांधकामे सुरू आहेत. ही बांधकामे रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सद्य:स्थितीत कोणतेही प्रयत्न करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पालिका निवडणूक लढविण्यासाठी विकासक, खासगी सावकार, व्यापारी उमेदवारांना पैसे देत नसल्याने, घोडे अडलेल्या उमेदवारांनी बेकायदा चाळी, गाळे उभारण्यासाठी भूमाफियांना हाताशी धरून फंड गोळा करण्याची नवी क्लृप्ती लढवली आहे.
कधी नव्हे एवढी बेकायदा आरसीसी, बेकायदा चाळी, गाळ्यांची बांधकामे कल्याण-डोंबिवली शहर, परिसरात सुरू आहेत. २७ गावांमध्ये अहोरात्र बेकायदा बांधकामे केली जात आहेत.
गावांमध्ये पालिका, नगरपालिकेचा कारभार सुरू झाला तर बांधकामे करणे मुश्कील होईल. या भीतीने गावांवर सध्या कोणाचेच नियंत्रण नसल्याने भूमाफियांनी बेकायदा बांधकामे करण्याचा सपाटा लावला आहे.
राजकीय मंडळींचा या बांधकामांमध्ये सर्वाधिक सहभाग असल्याचे या भागातील लोकांकडून सांगण्यात येते.

‘त्या’ गाळय़ाकडे दुर्लक्ष
पालिकेच्या कल्याणमधील मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिवाजी चौकात भर दिवसा एक बेकायदा गाळा बांधण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पालिका आयुक्तांपासून सर्व अधिकाऱ्यांची वाहने याच गाळ्यासमोर ये-जा करीत आहेत. तरीही, त्यांना हा बेकायदा गाळा दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाजी चौकात एक न्हाव्याचे दुकान होते. हा गाळा तोडून त्या ठिकाणी बांधकामाचे सर्व नियम उल्लंघून तीनशे चौरस फुटांचा एक गाळा उभारण्यात येत आहे. अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुरेश पवार, तत्कालीन प्रभाग अधिकारी भरत जाधव, अभियंता पोखरकर यांच्या संगनमताने हे बेकायदा बांधकाम उभे करण्यात येत आहे. या बांधकामात मोठी उलाढाल झाली असण्याची शक्यता वर्तवून माजी नगरसेवक राजन सामंत यांनी गाळेमालक व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केली.

शिवाजी चौकासह अन्य ठिकाणच्या बेकायदा बांधकामांच्या राजन सामंत यांनी तक्रारी केल्या आहेत. ती सर्व बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कारवाईचे अहवाल अधिकाऱ्यांकडून घेण्यात येणार आहेत. बेकायदा बांधकामांचे कोणत्याही प्रकारे संरक्षण केले जाणार नाही. कोणीही अधिकारी या प्रकारात सहभागी नाही.
– सुरेश पवार, उपायुक्त