तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीसाठी बालकांचा उपयोग

राज्यात गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी असताना रेल्वे स्थानक फलाट आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये गुटखा तसेच अन्य तंबाखुजन्य पदार्थविक्रीला जोर चढल्याचे चित्र दिसू लागले आहे. काही स्थानकांमध्ये लहान बालकांच्या मदतीने हा व्यवसाय केला जात असून पाकिटावरील किमतीपेक्षा जास्त दराने ही विक्री केली जाते. विक्री केली जाणारी पाकिटे गुटख्याची असल्याचे भासू नये यासाठी वेष्टनावर केवळ कंपनीचे नाव लिहिले जाते. त्यामुळे ही पाकिटे उघडून तपासल्याशिवाय तो गुटखा असल्याचे स्पष्ट होत नाही. स्थानकात गाडी थांबलेली असताना लहान मुलांकडून खुलेआम गुटख्याची विक्री केली जात असून त्याचा कचरा रेल्वे रुळांवर बिनदिक्कत टाकला जातो.

रेल्वे फलाट आणि मेल गाडय़ांमधील अवैध धंद्यांचे प्रकार राजरोसपणे सुरू असून रेल्वे सुरक्षा यंत्रणाच्या दुर्लक्षामुळे हे व्यवसाय अधिकच बळावू लागले आहेत. बेकायदा गुटखाविक्री करणाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून कारवाई होत असली तरी ती अत्यंत तुरळक अशी आहेत. त्यामुळे अशा पदार्थाची चोरटी वाहतूक करणाऱ्या विक्रेत्यांच्या टोळ्या अधिक सक्रिय होऊ लागल्या आहेत. कल्याण रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या बहुतेक गाडय़ा थांबतात. या गाडय़ांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना  गुटख्याचा पुरवठा करणारी टोळी बिनदिक्कत रेल्वे रुळांवर उतरून गुटख्याची विक्री करत असल्याचे चित्र आहे. कधी आठ ते दहा लहान मुलांची ही टोळी तर कधी एखाद् दुसरा मुलगा या विक्रीत सक्रिय असतात. विशेष म्हणजे त्यांना रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांचे भय नसते. ही मुले अल्पवयीन असल्याने अत्यंत चपळाईने १० रुपयांची गुटख्याची पुडी १५ रुपयांना विकत गर्दीतून पसार होत असतात. त्यांच्या या व्यवसायाला अन्य साथीदार फलाटावरून रसद पोहोचवत असतात. काही गडबड झाल्यास मुलांना तात्काळ तेथून पलायन करण्याच्या सूचना देत असतात. या सक्रिय टोळक्यांमुळे गुटखाविक्रीला कल्याण स्थानकात तेजी आली आहे. या प्रकरणी रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्याचा भ्रमणध्वनी बंद होता. तर स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला.

अल्पवयीन मुले गुटखाविक्री करत असल्याने त्यांना लहानपणीच तंबाखूचे व्यसन लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कमी वयातच हातात पैसे मिळू लागल्याने शिक्षणापासून अशी मुले परावृत्त होऊन अवैध व्यवसायात गुंतून जातात. त्यामुळेच अशा विक्रीवर राज्य शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने त्याचा फटका सामान्यांना होत आहे.

– राजेश घनगाव, कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे संघटना

ठाणे जिल्ह्य़ातील गुटखाविक्रीवर अन्न व औषध प्रशासनाकडून वारंवार कारवाई केली जात असून गेल्या आठवडाभरामध्ये भिवंडी, वसई आणि काशिमीरा भागांतून गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. सध्या कंपन्या पाकिटांवर कोणत्याही प्रकारचा गुटखा असा शब्द लिहीत नाहीत. तरी गोवा, विमल यांसारख्या कंपन्यांची पाकिटे उघडून पाहिल्यानंतर गुटखा असल्याचे लक्षात येते. त्यानंतर त्यावर जप्तीची कारवाई केली जात आहे.

– सुरेश देशमुख, सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन, ठाणे</strong>