स्थानिकांच्या आंदोलनानंतरही वाहतूक पोलिसांचा कानाडोळा

कोपरी परिसरात खासगी बसमधून होणारी प्रवाशांची बेकायदा वाहतूक व त्यामुळे या भागात होणारी वाहतूक कोंडी याचा विरोध करण्यासाठी स्थानिकांनी मंगळवारपासून उपोषण सुरू केले. परंतु, उपोषण सुरू असतानाही कोपरीत खासगी बसची अवैध वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, वाहतूक पोलिसांच्या डोळय़ांदेखत घोडबंदर ते कोपरी अशी वाहतूक मंगळवारीही सुरू होती. मात्र, ‘या बस कंपन्यांच्या असल्याने त्यांच्यावर आम्ही कारवाई करू शकत नाही,’ असे उत्तर पोलीस देत होते.

कोपरी संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी कोपरीतून घोडबंदर मार्गावर चालविण्यात येणाऱ्या अवैध बसगाडय़ांविरोधात कोपरी येथील स्टेशन रोड परिसरात लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले. कोपरी परिसरातील निमुळत्या रस्त्यांवरून मोठय़ा प्रमाणावर प्रवासी अवैध बस वाहतूक सरू असल्याने या भागात दररोज मोठी कोंडी होते. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकांनी हा संपूर्ण परिसर गिळंकृत केला असून वाहतूक पोलीस या असुरक्षित वाहतूकीकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी अशा एका खासगी बसची धडक लागून कोपरीत एका ज्येष्ठ नागरिकाला जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून स्थानिकांनी या अवैध वाहतुकीविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून कोपरी संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी या वाहतुकीविरोधात उपोषण सुरू करण्यात आले. हे उपोषण सुरू असताना तरी येथील अवैध वाहतुकीवर पोलीस रोख लगावतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र हे उपोषण सुरू असलेल्या स्थानक परिसरात अवैध बसची वाहतूक सुरू होती. हे पाहून नागरिकांचा रोष वाढताच या बसेस घोडबंदर ते बाराबंगला आणि कोपरीतील गुरुद्वारा सेवा रस्त्यापर्यंत थांबविण्यात येत होत्या. यातील काही बसेस कंपनीच्या आणि सोसायटीच्या होत्या. मात्र, वाहतूक पोलिसांसमोरच या कंपनीच्या बसमधून प्रवासी बाराबंगला आणि गुरुद्वारा येथे उतरविण्यात येत होते.

प्रवाशांना फटका

अवैध बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र या घडामोडींचा मोठा फटका आज बसल्याचे दिसून आले. उपोषणस्थळी गडबड होऊ नये यासाठी या बसेस बाराबंगला तसेच सेवा रस्त्यांवर अडविल्या जात होत्या. त्यामुळे काही प्रवाशांनी बाराबंगला ते रेल्वे स्थानक पायी किंवा मीटर रिक्षाने जावे लागले. ‘टीएमटीची अपुरी सुविधा असल्यामुळे आम्ही या खासगी बसने प्रवास करतो. या खासगी बसचे तिकीट दर हे टीएमटी बसपेक्षाही कमी आहेत. त्यामुळे यामधून प्रवास करणे परवडते,’ असे विजय मिश्रा या तरुणाने सांगितले.