बांधकामाला लागणाऱ्या रेतीचा तुटवडा कमी होत असल्याचे कारण पुढे करीत कोकणपट्टीतील रेती उपशाला परवानगी देण्याच्या हालचाली राज्य सरकारने चालवल्या असल्या तरी ठाणे, मुंब्रा, कळवा, डोंबिवली शहरांच्या खाडी परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून बेसुमार रेती उपसा सुरू आहे. अवैधरीत्या सुरू असलेल्या उपशातून काढलेल्या रेतीच्या एका ट्रकमागे २५ ते २७ हजार रुपयांची कमाई केली जात असून यावर शासनाचे नियंत्रण नसल्याने सरकारचा महसूल बुडीत आहेच; शिवाय खाडीतील पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहेत.
खाडीचे पर्यावरण राखले जावे यासाठी सक्शन पंप व ड्रेझरद्वारे रेती उपसा करण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र, ठाणे पट्टय़ात या बंदीला हरताळ फासण्यात आला आहे. ठाणे शहरातील खाडीकिनाऱ्यावर अवैधरीत्या सुरू असलेल्या रेती उपशावर जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत आहे. मात्र, दिवा, कोपर, डोंबिवली या शहरांच्या खाडीकिनाऱ्यांवर रेतीमाफियांनी पूर्णत: ताबा मिळवला आहे. पावसाळय़ाच्या तोंडावर तर दिवसरात्र येथे रेतीउपसा करण्यात येत आहे. रेतीच्या एका ब्रासची किंमत पाच हजारांच्या घरात आहे. पूर्वी रेतीचा एक ट्रक सहा हजारांना मिळायचा. मात्र आता हाच ट्रक २० ते २५ हजार रुपयांना मिळत आहे.
जमीन महसूल व पर्यावरण कायद्यान्वये रेती उपसा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला तरी, महसूल खाते व पोलिसांशी अर्थपूर्ण संबंध असल्याने दक्षता विभागाचा छापा पडणार असल्याची माहिती आधीच या माफियांना मिळालेली असते. यामुळे कारवाई झालीच तर ब्रास रेती, वाहने, पंप आदी साहित्य जप्त केले जाते व माफिया सहीसलामत सुटतात. या संदर्भात कल्याणचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याशी संपर्क साधला असता, अवैध रेतीउपशावर कारवाई सुरू असल्याचे ते म्हणाले. ‘कल्याण-डोंबिवलीमध्ये एप्रिल महिन्यात आम्ही कारवाई केली त्या वेळेस २२ क्रेन व ४०० ब्रास रेती जप्त केली होती. तसेच अवैधरीत्या ट्रकमधून वाहून नेणाऱ्या रेतीवर कारवाई सतत सुरूच असते,’ असा दावा त्यांनी केला.

रेती उपशाचे अड्डे
* उल्हास, काळू आणि भातसा या नद्या कल्याण खाडीला ज्या ठिकाणी येऊन मिळतात, त्या भागात उपशाचे प्रमाण जास्त आहे.
* कल्याण खाडीचा विस्तार डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर, कोपर, जुनी डोंबिवली खाडी, कोपरचा पूर्व भाग, दिवापर्यंत असून मुंब्रा ठाणे खाडीपर्यंत जातो. कल्याण-भिवंडी पुलापासून ते डोंबिवली कोपर खाडीपर्यंत हा उपसा गेल्या काही दिवसांपासून आणखी वाढला आहे.
* या उपशामुळे दिवा, कोपर, ठाकुर्ली व कल्याण रेल्वे स्थानकांना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
* कोपर खाडीमध्ये रात्रीच्या वेळेस २० ते २५ सक्शन पंप लागत असून किमान सुमारे ६२५ ब्रास रेती एका रात्रीत काढली जात असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली.
शर्मिला वाळुंज, डोंबिवली