डोंबिवलीलगत असलेल्या कोपर परिसरातील खाडी किनाऱ्यावर पुन्हा एकदा रेतीमाफियांचा धुमाकूळ सुरू आहे. ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सरकारी जमिनीवर बेकायदा बांधकामे तसेच अवैध रेती माफियांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. भिवंडी परिसरात होणाऱ्या रेती उपशाविरोधातही त्यांच्या आदेशानुसार मध्यंतरी कारवाई करण्यात आली होती. असे असताना कोपरखाडी किनाऱ्यावर मोठे सक्शन पंपाच्या साहाय्याने रेती उत्खनन सुरू असून यामुळे या परिसरातील रेल्वे रुळांना धोका निर्माण झाला आहे. या परिसरात १५ ते १६ सक्शन पंपाच्या साहाय्याने दिवस-रात्र रेती उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्याच्या हंगामात रेतीला मोठी मागणी असून ती पूर्ण होत नसल्याने चोरटय़ा मार्गाने रेती उत्खनन केले जात आहे. जिल्हा प्रशासनाने या विरोधात मध्यंतरी धडक मोहीम राबवली होती.
मात्र काही दिवसांमध्येच ही मोहीम थंड झाल्याने पुन्हा रेतीमाफियांचे उद्योग नव्या जोमाने सुरू झाले आहेत. ठाण्याच्या विस्तृत खाडी किनाऱ्यावर टप्प्याटप्यांवर रेती माफियांची टोळ्या कार्यरत आहेत. या ठिकाणी अनधिकृत पद्धतीने रेती काढून त्याची विक्री केली जाते. ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी खाडी किनाऱ्यावर सुरू असलेल्या या रेती उपशावर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकारी वर्गाला दिले होते. काही काळ कारवाई केल्यानंतर गायब झालेले रेती माफिया पुन्हा अवतरण्यास सुरुवात झाली असून त्यांची संख्या कमालीची वाढली आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, कळवा, डोंबिवली आणि कल्याण सगळ्याच भागातील खाडी किनाऱ्यावर त्यांची हजेरी असून शासकीय विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. रेल्वे रुळांच्या अगदी जवळ येऊन हा उपसा सुरू असल्याने रेल्वे रूळ खचण्याची शक्यता निर्माण झाली असून मोठा अपघात इथे होण्याची भीती पर्यावरण स्नेहींकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे या भागातील रेतीमाफियांविरोधात कारवाई करण्याची मागणी परिसरातील रहिवासी करू लागले आहेत.