अतिक्रमणमुक्त झालेल्या भागावर विक्रेत्यांचे बस्तान

ठाण्यातील व्यावसायिक हब अशी ओळख असणाऱ्या राम मारुती मार्गावरील दुकानदार गेल्या काही महिन्यांपासून या भागात ठरावीक दुकानांपुढील जागा अडवून व्यवसाय करणाऱ्या बेकायदा व्यावसायिकांमुळे अक्षरश हैराण झाले आहेत. वारंवार तक्रार करूनही महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत असल्याचे अधिकृत दुकानदारांचे म्हणणे असून त्यामुळे संतापलेल्या व्यावसायिकांनी आम्हालाही पदपथांवर व्यवसाय करू द्या, अशी उपहासात्मक मागणी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.

ठाणे शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी महापालिकेने गेल्या वर्षभरापासून शहरातील बेकायदा बांधकामांवर जोरदार कारवाई केली आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसर, पोखरण रस्ता, इंदिरानगर, कळवा, मुंब्रा अशा भागांतील अतिक्रमणांवर मोठय़ा प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी सुरू असलेल्या या कारवाईचे ठाणेकरांकडून उत्स्फूर्त असे स्वागतच होत आहे. या कारवाईचा भाग म्हणून महापालिकेने मध्यंतरी शहरातील दुकानदारांनी केलेल्या वाढीव बांधकामांवरही हातोडा फिरवला. मार्जिनल स्पेसवर दुकाने थाटून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनीही जयस्वाल यांच्या धसक्यामुले आपला हा अतिरिक्त संसार आटोपता घेतला. ठाणे शहराचे मुख्य व्यावसायिक केंद्र असलेल्या राम मारुती मार्गावरील दुकानदारांनाही या कारवाईचा फटका बसला. वर्षांनुवर्षे मोठमोठी शेड्स टाकून व्यवसाय करणारे व्यापारी महापालिकेच्या या कारवाईमुळे अस्वस्थ आहेत.

या पाश्र्वभूमीवर राम मारुती मार्गावर पदपथ रस्ते अडवून काही टपऱ्या उभा राहिल्या असून त्यावर कारवाई होत नसल्याने येथील व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. रस्त्यालगत असलेल्या काही दुकानदारांना महापालिकेच्या शहर विकास विभागाने आपआपल्या सीमा ठरवून दिल्या आहेत. त्याच ठिकाणी व्यापार करावा, असा दमही या व्यापाऱ्यांना भरण्यात आला आहे. असे असताना काही ठिकाणी मात्र पदपथ आणि मुळ दुकानाची जागा ओलांडून व्यवसाय सुरू असल्याने इतर व्यापारी अस्वस्थ झाले आहेत. या प्रकरणी काही दुकानदारांनी अतिक्रमण विरोधी पथकाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. त्यानंतरही कारवाई होत नसल्याने संतापलेल्या व्यापाऱ्यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांना उपहासात्मक पत्र पाठवून आम्हालाही पदपथांवर व्यवसाय करू द्या, अशी मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर या पत्रामध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की खुद्द आयुक्तांनीच त्यांच्या या पदपथ व्यवसायाचा शुभारंभ करावा. जेणेकरून आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या टपऱ्यांकडे अतिक्रमण खाते दुर्लक्ष करेल, असेही पत्रात म्हटले आहे.

राम मारुती मार्गावर चित्रा सलून व इमेज बॅग या दोन दुकानांच्या मधोमध पूजेच्या साहित्याची विक्री केली जाते. संबंधित दुकानदाराने ही टपरी चक्क पदपथावर उभारल्याने येथील अधिकृत दुकानदारांमध्ये संताप आहे. याच मार्गावर अशा काही बेकायदा टपऱ्यांमुळे इतर दुकाने दिसेनाशी झाली आहेत, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.