खाद्यपदार्थ विक्री दुकानांचा ठाणेकरांना अडथळा

ठाणे महापालिकेची चुरशीची निवडणूक ऐन भरात असताना येथील रेल्वे स्थानक परिसरात दिवसागणिक बेकायदा फेरीवाले आणि टपऱ्यांचा उपद्रव वाढू लागला असून अतिक्रमण मुक्तीची भाषा करत एरवी मोठय़ा गर्जना करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ठाणेकर प्रवाशांचा मात्र मनस्ताप वाढू लागला आहे.

रेल्वे स्थानकाबाहेर मनमानेल त्या पद्धतीने उभी राहाणारी वाहने, रिक्षाचालकांची मनमानी, पदपथ अडविणारे फेरीवाले हा त्रास ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांच्या पाचवीला पुजलेला असतो. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मात्र ठाणेकरांची ही दुखरी नस लक्षात घेऊन गेल्या काही दिवसांपासून हा परिसर अतिक्रमण मुक्त करण्यास प्राधान्य दिले होते. निवडणुकांच्या हंगामात मात्र या वाढत्या अतिक्रमणाकडे महापालिका प्रशासनाची डोळेझाक झाली असून यामुळे कधी नव्हे त्या प्रमाणात फेरीवाले आणि अतिक्रमणांनी येथील परिसर व्यापला आहे. रेल्वे स्थानकाबाहेरील चिंचोळ्या गल्लीत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ठाण मांडले असून अत्यंत तुटपुंज्या जागेत खाद्यपदार्थाची विक्री सुरू असल्याने सकाळी आणि सायंकाळच्या वेळी परिसरात मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. विशेष म्हणजे स्थानकाबाहेरील लहान गल्लीबोळाच्या प्रवेशद्वारावरच वडे, सामोसे तळण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. स्थानकाबाहेरील या गल्लीबोळातील खाद्यपदार्थावर चाकरमानी सकाळच्या पेटपूजेसाठी ताव मारत असले तरी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास परिसरात सुरक्षेची व्यवस्था नसल्याने या ठिकाणाहून प्रवास करणे जिकिरीचे होत आहे.

सकाळी सातनंतर स्थानक परिसरातील डॉ. आंबेडकर पुलाखाली खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे बस्तान बसते. कांदे पोहे, उपमा, शिरा विकणारे विक्रेते अनधिकृतरीत्या आसन मांडून व्यवसाय करतात. परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर प्रवासी आणि वाहनांना अडथळा होत असल्याचे तन्वी गांधी यांनी सांगितले. सकाळी दहाच्या सुमारास पुलाखालील खाद्यपदार्थ विक्रेते निघून गेल्यावर या परिसरातील गल्लीबोळातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू होतो. स्थानकाजवळच असलेल्या गल्लीच्या प्रवेशद्वारापाशी वडे, समोसे तळण्याचे काम सुरू असते. याच ठिकाणी तात्काळ तिकिटासाठी प्रवासी ये-जा करत असतात. खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी नागरिकांची गर्दी, तिकीट घेण्यासाठी प्रवाशांची वर्दळ  अशा परिस्थितीत या ठिकाणी एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सुरक्षेविषयी कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही. परिणामी या ठिकाणाहून प्रवास करणे धोक्याचे असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

प्रेमी युगुलांचाही त्रास

ठाणे रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर फलाट क्रमांक एक आणि दोनच्या बाहेर कोणतेही प्रेमी युगुल बसलेले असतात. महाविद्यालयीन तरुण-तरुणी आजूबाजूच्या परिस्थितीचे भान ठेवत नसल्याने स्थानक परिसरातही प्रेमी युगुलांचे असभ्य वर्तन सहन करावे लागते, असे ज्येष्ठ नागरिक निळकंठ पोलेकर यांनी सांगितले.

रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंगमुळे नागरिकांना या ठिकाणाहून प्रवास करणे अडथळ्याचे ठरते. बीकेबीन रस्त्याच्या बाजूकडील रेल्वे स्थानकातून प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी पायऱ्या आहेत. मात्र त्या ठिकाणी दुचाकी उभ्या केल्या असल्याने  या ठिकाणाहून मार्गक्रमण करता येत नाही.

एकनाथ सोनावणे, प्रवासी