काश्मीरमधून सैन्य काढून घेण्याची पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मागणी भारताने गुरुवारी फेटाळून लावली. त्याऐवजी पाकिस्ताननेच स्वत:ला ‘दहशतवादमुक्त’ करावे, असे भारताने ठणकावले.

आपल्या ४ सूत्री ‘शांतता उपक्रमाचा’ भाग म्हणून काश्मीरमधून सैन्य काढून घ्यावे, या शरीफ यांच्या मागणीवर भारताने ही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत बुधवारी केलेल्या भाषणात शरीफ यांनी काश्मीर मुद्दा उकरून काढताना, हा प्रश्न न सुटणे हे संयुक्त राष्ट्रसंघाचे अपयश असल्याचे म्हटले होते.

काश्मीरमधून सैन्य हटवणे नव्हे, तर पाकिस्तान दहशतवादमुक्त करणे हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पाकिस्तान हा दहशतवादाचा मूळ बळी नसून तो स्वत:च्या धोरणांचा बळी आहे. वस्तुत: तो दहशतवादाचा प्राथमिक पुरस्कर्ता आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ट्विटरवर दिली.

पाकिस्तान हा दहशतवादाचा ‘प्राथमिक बळी’ असल्याचे शरीफ यांनी म्हटले असले, तरी तो दहशतीचा उपयोग राज्याचे ‘वैधानिक हत्यार’ म्हणून करत असल्यामुळे तो ‘दहशतवादाचा प्राथमिक पुरस्कर्ता’ असल्याचे वर्णन दुसऱ्या एका भारतीय अधिकाऱ्याने केले.

वस्तुस्थिती अशी आहे, की पाकिस्तान हा स्वत:च दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या व पुरस्कृत करण्याच्या स्वत:च्या धोरणांचा बळी आहे. याचे परिणाम त्याच्या नजीकच्या शेजारापलीकडे पसरले असून याकडे सारे जग काळजीने पाहात असल्याचे भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रथम सचिव अभिषेक सिंग यांनी महासभेच्या ७०व्या सत्रात भारताचा प्रत्युत्तराचा हक्कवापरताना दिलेल्या सणसणीत उत्तरात सांगितले.

पाकिस्तानमधील अस्थैर्य दहशतवादाचे पालनपोषण करण्यातून उद्भवले असून, त्यासाठी शेजाऱ्यांना दोष देणे हा उपाय नाही, असेही सिंग ट्विटरवर म्हणाले. ‘‘पाकिस्तानी व पॅलेस्टिनी हे विदेशी लोकांच्या आक्रमणामुळे उत्पीडित आहेत’’, या शरीफ यांच्या वक्त्यावर त्यांना

टोला लगावताना सिंग म्हणाले की, या प्रकरणात काश्मीरवर कब्जा करणारा पाकिस्तान आहे. भारताने प्रत्येक वेळी मैत्रीचा हात पुढे केला आहे, यावर त्यांनी भर दिला.