संगणकीय संक्रमणामुळे हजारो गुंतवणूकदारांना फटका; कोटय़वधी रुपयांच्या ठेवींचा परतावा रखडला
देशभरातील टपाल कार्यालये एकमेकांशी जोडण्यासाठी टपाल खात्याचा संपूर्ण कारभार संगणकीय प्रणालीवर आणण्याचे काम सुरू असतानाच या संक्रमणावस्थेचा मोठा फटका सध्या मुंबई, ठाण्यासह राज्यभरातील टपाल गुंतवणूकदारांना बसू लागला आहे. टपालाच्या या संक्रमणावस्थेत नव्याने संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे जुन्या खात्यांचे हिशेब त्वरित उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी खुद्द टपाल कर्मचारीच करू लागले आहेत. या सर्व प्रक्रियेत हजारो गुंतवणूकदारांना गेले तीन महिने आपल्या गुंतवणूक रकमेचा परतावा मिळू शकलेला नाही. विशेष म्हणजे, या संकटासाठी चेन्नईचा पूर कारणीभूत असल्याचे टपाल कर्मचारीच सर्रास सांगू लागल्याने टपाल कार्यालयात खेटे घालणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मनात संभ्रमाचा पूर लोटला आहे.
अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभराची कमाई विश्वासाने टपाल खात्याच्या विविध योजनांमधून गुंतवली आहे. या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजातूनच त्यांचा महिन्याचा खर्च भागविला जातो. एकटय़ा ठाणे जिल्ह्य़ात तीसहून अधिक टपाल कार्यालये असून त्यापैकी १३ ठाणे शहरात आहेत. येथील ग्राहक गेले दोन महिने संबंधित कार्यालयांत हेलपाटे घालत आहेत. मात्र त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर दिले जात नाही. खरेतर टपाल विभागाने ग्राहकांना या गैरसोयीविषयी पूर्वसूचना देणे आवश्यक होते. मात्र ते सौजन्य विभागाने दाखविले नाहीच, उलट याबाबत टोलवाटोलवीची उत्तरे देऊन मनस्तापात भर टाकली जात असल्याचे एका ग्राहकाने सांगितले.
संगणक प्रणालीच्या अद्ययावतीकरणाचे काम जोमाने सुरू असताना टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडील उपलब्ध माहितीचा साठा गहाळ झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे मुदत संपूनही ग्राहकांना त्यांच्या ठेवी मिळालेल्या नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून शेकडो ग्राहकांच्या ठेवींची मुदत संपली आहे. त्यामुळे रखडलेल्या या दिवसांचेही व्याज देणार का, असा ग्राहकांचा सवाल आहे. एकटय़ा ठाणे जिल्ह्य़ात या ठेवी काही कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते.

सध्या टपाल खाते संगणकीय संक्रमणावस्थेतून जात आहे. त्यामुळे काही कार्यालयांतील प्रणाली कूर्मगतीने काम करत आहे. ठाण्यातील टपाल कार्यालयात हीच समस्या भेडसावत असून यामागे चेन्नई पुराचा आणि तेथील सव्‍‌र्हरला फटका बसण्याचा काहीच संबंध नाही. टपालाचा मुख्य सव्‍‌र्हर धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी (कोपरखैरणे) येथे आहे. तर आपत्कालीन परिस्थितीसाठीचा दुसरा सव्‍‌र्हर म्हैसूर येथे आहे. चेन्नईत टपाल खात्याचा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विभाग असून त्याचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही.
– रणजित कुमार,
पोस्टमास्तर जनरल (मुंबई क्षेत्र)

मी टपाल खात्यात दरमहा व्याज मिळणाऱ्या योजनेत ६६ हजार रुपये गुंतविले आहेत. त्यापोटी माझ्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात दरमहा ४४० रुपये व्याज जमा होत होते. नोव्हेंबर महिन्यापासून मात्र हे व्याज जमा होणे बंद झाले. त्याबद्दल टपाल खात्यात विचारणा केली असता ३१ डिसेंबर रोजी मला व्याजाची रक्कम रोखीने देण्यात आली. त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारीचे व्याज देण्यात मात्र टपाल खात्याने असमर्थता दर्शवली आहे. दरम्यान २७ जानेवारी रोजी माझ्या ठेवीची मुदत पूर्ण झाली. मात्र ते पसे कधी मिळणार याबाबत टपाल अधिकारी कोणताही माहिती देत नाहीत.
विलास नुरकर, ठाणे</strong>