tvlog03साहेब, माझी पैशाची पिशवी रस्त्याने जात असताना कुणीतरी हिसकावली,’ अशा प्रकारच्या तक्रारी गेल्या दोन महिन्यांपासून डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात वाढल्या होत्या. दिवसाला एक ते दोन अशा प्रकारच्या तक्रारी पोलीस ठाण्यात यायच्या. ‘पिशवी हिसकावणारा माणूस पाहिला का’ असा प्रश्न पोलिसांनी विचारला की, त्यावर तक्रारदाराचे नाही असे उत्तर असायचे. पैसे चोरीला गेल्याने तक्रारदार व्यक्तीची मानसिक अवस्था ठीक नसायची. तो पोलिसांना काही सांगण्याच्याही मन:स्थितीत नसायचा. साधारण ४० ते ५० वयोगटांतील व्यक्तींच्या हातामधील पिशव्या हिसकावून चोरून नेल्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. चोरी केल्यानंतर चोर त्या व्यक्तीच्या समोरून, मागून पळून जातो. या ‘अनोख्या’ चोरी प्रकारात तसा काहीही प्रकार दिसत नव्हता. या ‘चमत्कारिक’ चोरी प्रकारामुळे पोलीस हैराण झाले होते. पिशव्या हिसकावण्याचे व तशा तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण रामनगर हद्दीत वाढू लागले होते.
लोकल पाकीटमारीतील मंदी
रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर यांनी पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाळदे, उपनिरीक्षक महेश जाधव, हवालदार तायडे व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांची गटागटाने पथके तयार केली. सुरुवातीला गणवेशातील पोलीस रामनगर हद्दीतील एक चौक सोडून गस्त देऊ लागले. ज्या चौकात पोलीस नसत, त्या चौकात लोकांच्या हातामधील पिशव्या चोरल्या जात असल्याचे प्रकार घडू लागले. म्हणजे चोर पोलिसांवर पाळत ठेवून चोऱ्या करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. चोर आपल्यावर पाळत ठेवून असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यावर पोलिसांनी साध्या वेशात गस्त सुरू केली. चहाची टपरीवर उभा रहा, फेरीवाल्यांशी खरेदीचा बहाणा करून त्याच्याशी चर्चा कर. असे प्रकार करून चोरांचा शोध लागतो का म्हणून पोलीस तपास करू लागले. अभ्यास म्हणून काही ठिकाणच्या सीसीटीव्हीमधील चित्रफिती पोलिसांनी पाहिल्या. त्यावेळी एका माणसाच्या भोवती अचानक काही माणसे गर्दी करतात. त्या ठिकाणी पिशवी चोरीचा प्रकार घडत असल्याचे लक्षात आले. वेगवेगळ्या ठिकाणच्या सीसीटीव्ही चित्रफितीत एकासारखे चेहरे दिसत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांमार्फत या चोरांची माहिती काढली.
या खबऱ्यांनी दिलेली माहिती धक्कादायक होती. ‘‘लोकलमध्ये जे भुरटे पाकीटमारीचे धंदे करीत होते. ते पाकीटमार लोकलमधील पाकीटमारीत काहीही मिळत नाही, म्हणून शहरातील पिशवी चोरी प्रकरणात उतरले आहेत. लोकलमधून प्रवास करणारा माणूस खिशात जास्त पैसे ठेवत नाही. बहुतेक लोक अलीकडे ‘एटीएम’ कार्डचा वापर करतात. त्यामुळे लोकलमधील पाकीटमारीत मंदी आल्याने पाकीटमारांनी हा दुसरा धंदा पत्करला असल्याचे खबऱ्यांकडून पोलिसांना सांगण्यात आले.  
ज्येष्ठ, वृद्ध मंडळी सावज लोकलमध्ये पाकीटमारी करताना जी पद्धत चोर अवलंबतात, तीच पद्धत ते लोकांच्या हातामधील पिशव्या हिसकावताना वापरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. साधारपणे लोक सकाळी ९ ते दुपारी एक वाजेपर्यंत घरातून बँकेत पैसे भरण्यासाठी बाहेर पडतात. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, वृद्ध यांचा समावेश असतो. अनेक जवाहिर, व्यापारी घरातील किंवा दुकानातील पुंजी पिशवीत घेऊन ये-जा करीत असतात. त्यांना या चोरटय़ांकडून लक्ष्य केले. एक दिवस जागा खरेदीसाठी जमा केलेली चार लाखांची पुंजी एका पिशवीत घेऊन एक सद्गृहस्थ सकाळच्या वेळेत बँकेत चालले होते. त्याच वेळी रस्त्यावर सापळे लावून असलेल्या चोरटय़ांनी ‘सावज’ म्हणून त्यांचा पाठलाग सुरू केला.
भर रस्त्यात त्यांना काही कळायच्या हात त्यांची चार लाखांची पिशवी हिसकावण्यात आली. ही घटना घडल्यानंतर जाधव यांना एका रस्त्याने आठ तरुण रस्त्याच्या दुतर्फा एकमेकांशी न बोलता चालत असल्याचे लक्षात आले. हे भुरटे असावेत असा संशय घेऊन त्यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ते गल्लीबोळातून पसार झाले. पोलीस पथकाने पाठलाग करून त्यापैकी एकाला पकडले.
कल्याणमधील राजा कीडा ऊर्फ नासीर आणि त्याचे चार भाऊ हे पिशवी हिसकावण्याचा धंदा करीत असल्याचे पकडलेल्या आरोपीच्या चौकशीतून निष्पन्न झाले. या चार जणांना मुंबई परिसरातील २० ते २५ पाकीटमार या चोरीच्या धंद्यात साथ देत होते. या टोळीतील तीन जणांना पोलिसांनी अटक केली. उर्वरित १० जणांची नावे कळली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.

गुन्ह्य़ाची पद्धत
बँक, जवाहीर, घरातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीवर एक म्होरक्या पाळत ठेवतो. या म्होरक्याच्या ५० मीटर परिसरात २० ते २५ जण ठरावीक अंतरावर उभे असतात. म्होरक्याने इशारा केल्यावर ती व्यक्ती जाईल तिथे तिचा हे २५ जण पाठलाग करीत राहतात. रेल्वे स्थानक, गर्दीच्या रस्त्यावर हे पंचवीस जण त्या व्यक्तीच्या हातामधील पिशवी चोरण्यासाठी इशाऱ्यावर एकदम त्या व्यक्तीच्या जवळ नागरिक म्हणून गर्दी करतात. या टोळीतील एकाच्या हातात मोठी किलतानची पिशवी असते. चोरी करताना एक जण पिशवी असलेल्या व्यक्तीला खेटून पाठीमागे किलतानची पिशवी डोक्याच्या भागाकडे करून उभी राहते. बाकी पंधराजण सावजाच्या आजूबाजूला कृत्रिम गर्दी करतात. तेवढय़ात एक जण त्या सावजाच्या हातामधील पैसे, ऐवजाची पिशवी हिसकावते. टोळीतील किलतानची पिशवी असलेल्या पिशवीत टाकते. पिशवी हिसकावल्यानंतर वीस जण शांतपणे त्या सावजाच्या समोरून चालू लागतात. त्यामधील दोघे जण सावजाला ‘अहो, काका तुमची पिशवी त्या मागे पळणाऱ्या माणसाने पळवली’ अशी दिशाभूल करणारी माहिती देऊन तेथून पुढे सटकतात. काकांची पिशवी टोळीने शांतपणे, काकांच्या समोरून नेलेली असते. काका पिशवी कोणी पळवली म्हणून मागे पळत सुटतात. तोडफोड, शस्त्र न वापरता शांतपणे ही चोरी केली जात होती. या टोळीकडे हत्यारे पण असतात. विरोध झाला तर त्यांच्याकडून शस्त्रबळाचा पण वापर होऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले.
भगवान मंडलिक