बिल्डर, राजकीय वर्तुळात खळबळ

ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर हा गेल्या काही वर्षांपासून ठाणे, नवी मुंबई तसेच मुंबई शहरातील बिल्डर व सराफांकडून खंडणी वसूल करत असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मंगळवारी दिली.

तसेच ठाण्यातील खंडणीचे रॅकेट चालविण्यासाठी त्याला शहरातील एक बिल्डर, दोन नगरसेवक आणि काही राजकीय नेते मदत करत असल्याची माहिती आयुक्त सिंग यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हा बिल्डर, नगरसेवक आणि राजकीय नेते कोण, याविषयी आता शहरात चर्चा सुरू झाली आहे.

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या टोळीचे सदस्य शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि सराफांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूल करत असल्याची माहिती हाती आली होती. या माहितीच्या आधारे तपास सुरू असतानाच घोडबंदर भागातील एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडून चार फ्लॅट व तीस लाख रुपयांची खंडणी घेण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणामध्ये इक्बाल कासकर याचे नाव समोर आले होते. याप्रकरणी इक्बाल कासकर याच्यासह मुमताज इजाज शेख आणि इसरारअली जमील सय्यद या तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या खंडणी वसुली प्रकरणात दाऊद इब्राहीमचा सहभाग असल्याचे आढळून आले तर त्यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात येईल. तसेच त्याला भारतात आणण्यासाठीही प्रयत्न केले जातील.

अशी व्हायची वसुली..

मुमताज आणि इसरारअली हे दोघे मालमत्ता विक्रीचा व्यवसाय करीत असून त्यांची एकमेकांशी ओळख होती. यापैकी इसरारअली याचा इक्बाल कासकर यांच्याशी संपर्क होता. बिल्डरांनी खरेदी केलेल्या जमिनीची माहिती मिळवून जमीनमालकांच्या अन्य नातेवाईकांना मुमताज गाठायचा.

तसेच त्यांना विक्री झालेल्या जागेमध्ये हिश्शाचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवायचा. त्यानंतर या नातेवाईकांची तो इसरारअली याच्यासोबत भेट घालून द्यायचा. त्यानंतर या नातेवाईकांना हाताशी धरून त्यांची जमीन इक्बाल कासकर याने विकत घेतल्याचे सांगत इसरारअली संबंधित बिल्डरांना खंडणीसाठी धमकावयाचा. या खंडणीसाठी तो मोबाइलवरून इक्बाल कासकर यांच्याशी बोलणे करून देत होता.

तेनेते कोण?

ठाणे, नवी मुंबई तसेच मुंबई शहरातील बिल्डर व सराफांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसुली करण्याचे काम इक्बाल कासकर हा गेल्या काही वर्षांपासून करत असल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. ठाण्यातील खंडणीचे रॅकेट चालविण्यासाठी शहरातील एक बिल्डर, दोन नगरसेवक आणि काही राजकीय नेते मदत करत असल्याचे समोर आले असून त्यांच्या चौकशीनंतरच ते खंडणी रॅकेटमध्ये कशा प्रकारे कार्यरत होते, याविषयी समजू शकेल, अशी माहिती आयुक्त सिंग यांनी दिली.