इकबाल कासकरला एका बिल्डरकडे खंडणी मागितल्या प्रकरणी सोमवारी रात्री पोलिसांनी अटक केली. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. इकबाल कासकर हा खंडणीचे रॅकेट चालवत होता अशी माहिती आम्हाला मिळाली. इकबाल दाऊदचा भाऊ आहे, त्याच्या नावे दहशत पसरवून तो बिल्डर्सना धमकावत होता. आमची टीम त्याला अटक करण्यासाठी गेली तेव्हा तो बहिण हसीना पारकरच्या नागपाडा येथील घरी बिर्याणी खात ‘कौन बनेगा करोडपती’ शो बघत होता. पोलीस अटक करतील याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

त्याने एका बिल्डरकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणात काही स्थानिक राजकीय नेते आणि काही बिल्डर्सचाही समावेश आहे, असेही सिंह यांनी स्पष्ट केले. मोक्का अंतर्गत इकबालवर कारवाई करता येईल का हे पडताळून पाहिले जात आहे. ठाण्यातील अनेक बिल्डर्सना खंडणीसाठी इकबालने धमक्या दिल्या होत्या अशीही माहिती सिंह यांनी दिली.

ठाण्यातील बिल्डर्स, ज्वेलर्स यांना खंडणीच्या रूपात फ्लॅट आणि सोने देण्यासाठी इकबालच्या गँगकडून दबाव टाकला जात होता. फ्लॅट, सोने आणि रोखीच्या स्वरूपात आत्तापर्यंत त्याने अनेक बिल्डर्सकडून खंडणी गोळाही केली आहे. सोमवारी ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने धमकीचे फोन येत असल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात नोंदवली. ही तक्रार नोंदवल्यानंतर रात्री अटकेची कारवाई करण्यात आली, अशी माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.

मागील पाच वर्षांपासून दाऊदच्या नावे इकबाल खंडणी मागत होता. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि ज्वेलर्स मालकांना धमकावात होता. आता त्याच्या चौकशीदरम्यान अनेक गोष्टींची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे असेही रानडे यांनी म्हटले आहे.