५१ सेकंदात ५६ लाखांची लूट; अद्याप कोणतेही धागेदोरे हाती नाही
नालासोपाऱ्यातील नक्षत्र ज्वेलर्सवर पडलेल्या दरोडय़ात अद्याप पोलिसांना कसलेलच धागेदोरे मिळालेले नाहीत. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या या ज्वेलर्सवर अवघ्या ५१ सेकंदात ५६ लाख रुपयांचे दागिने लुटून नेले होते. व्यापाऱ्याची हत्या आणि ज्वेलर्सवरील दरोडा यामुळे वसईतल्या व्यपाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
नालासोपारा आचोळे रोडवर असलेल्या मार्टिन कॉम्प्लेक्समधील नक्षत्र ज्वेलर्सवर शनिवारी रात्री पाच जणांनी दरोडा घातला. बंदुकीचा धाक दाखवत पाच जण दुकानात शिरले होते आणि त्यांनी अवघ्या ५१ सेकंदात दुकानातील ५६ लाखांचे दागिने लुटून नेले होते. पोलिसांनी या दरोडय़ाच्या तपासासाठी सहा पथके तयार केली आहेत. सीसीटीव्ही मध्ये लुटीचा हा थरार कैद झालेला आहे. या दरोडेखोरांचे अन्य दोन साथीदार बाहेर उभे असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दरोडेखोराच्या शोधासाठी नालासोपाऱ्याच्या विविध भागांत रविवारपासून जोरदार कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. हे दरोडेखोर याच भागात लपले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.
लुटीच्या वाढत्या घटना..
गेल्या आठवडय़ात विरारच्या चंदनसार येथे तांदूळ व्यापारी अशोक शहा यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती आणि त्यांच्याकडील दहा लाख रुपये लुटून नेण्यात आले होते. त्यापाठोपाठ लुटीची ही दुसरी घटना घडली आहे. अवघ्या ५१ सेकंदात ज्या प्रकारे दरोडा घालून ५६ लाकांची लूट करण्यात आली आहे ते पाहता या टोळीने पूर्ण अभ्यास आणि रेकी केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. मार्टनि कॉम्प्लेक्स अहा नालासोपारा रोडवरील अत्यंत गजबजलेला परिसर आहे. तेथे चार रस्ते एकत्र येतात. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे कार्यालयही घटनास्थळावरून जवळच आहे. त्यामुळे अशा वर्दळीच्या ठिकाणी साडेआठच्या सुमारास दरोडा पडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. व्यापाऱ्याची हत्या आणि पाठोपाठ सराफाच्या दुकानावर दरोडा यामुळे व्यापारी आणि सराफांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

आम्ही या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करीत आहोत. गोळीबार न करता लूट झाली होती. त्यामुळे हा बनाव असल्याची शंका वर्तवली जात होती, परंतु आम्ही सर्व शक्यता पडताळून तपास करीत आहोत. हा तूर्तास तरी बनाव वाटत नाही.
– श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक.