ठाणे महापालिकेत नुकत्याच झालेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवड प्रक्रियेत पक्षश्रेष्ठींचा आदेश धाब्यावर बसवून बडतर्फी ओढवून घेणाऱ्या काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील नेत्यांच्या पंक्तीत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील नेतेही जाऊन बसण्याची शक्यता आहे. ठाण्यातील राष्टवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचे समर्थक अशोक राऊळ यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे आदेश झुगारून ठाण्यातील नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक व शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्या गळ्यात स्वीकृत नगरसेवकपदाची माळ घातल्याने डावखरे विरुद्ध आव्हाड हा संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे.  
ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरातून तब्बल चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत अशोक राऊळ यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. ठाण्यातील राजकीय वर्तुळात अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेले राऊळ हे विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या समर्थकांपैकी मानले जातात. स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवड प्रक्रियेत राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आलेल्या दोन जागांपैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यामुळे उर्वरित जागेसाठी पक्षात कमालीची चुरस रंगली होती. या पदावर शहराध्यक्ष मनोज प्रधान यांची निवड करण्यास राष्ट्रवादीतील एका मोठय़ा गटाचा विरोध होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अध्यक्ष म्हणून प्रधान यांची कामगिरी यथातथाच असल्याचा पक्षात सूर आहे.
असे असताना त्यांना नगरसेवकपदाची बक्षिसी देणे योग्य होणार नाही, असा सूर महापालिकेतील काही ज्येष्ठ नगरसेवकही व्यक्त करीत होते. या पाश्र्वभूमीवर अशोक राऊळ यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करावी, अशा स्वरूपाचे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पक्षाचे महापालिकेतील नेते हणमंत जगदाळे यांना दिले होते. मात्र, जगदाळे यांनी ऐन वेळेस राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांचे नाव पुढे करीत त्यांची निवड घडवून आणली. पक्षश्रेष्ठींचे पत्र असल्याने आपली निवड होईल, या आशेने मुख्यालयात आलेले राऊळ यांना भरल्या डोळ्याने माघारी फिरावे लागल्याचे   दृश्य मंगळवारी दिसून आले.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे पट्टशिष्य असलेल्या प्रधान यांच्या निवडीमुळे वसंत डावखरे गटात कमालीची अस्वस्थता असून या घटनेचे पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘गोल्डन गँग’मुळे डावलल्याचा आरोप
या प्रकरणी अशोक राऊळ यांच्याशी संपर्क साधला असता, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा आदेश झुगारून आपल्यावर अन्याय करण्यात आल्याची भावना व्यक्त केली. ‘महापालिकेतील कंत्राटी कामांमध्ये टक्केवारी लाटणारी एक ‘गोल्डन गँग’ गेल्या काही वर्षांपासून सक्रिय आहे. ही गँग ठाण्यातील काही नेत्यांनाही आर्थिक रसद पुरवते. माझी निवड झाली तर गोल्डन गँग निष्प्रभ होईल आणि नेत्यांचे दुकान बंद होईल, या भीतीने माझी निवड डावलण्यात आली,’ असा आरोप त्यांनी केला.