ठाणे-कळवा आणि ठाणे-नवी मुंबई हा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने कळवा खाडीवर आखलेल्या नव्या उड्डाणपुलाचा मार्ग अखेर सुकर झाला आहे. महाराष्ट्र सागरी किनारा नियमन व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) या कामास वर्षभराच्या सखोल विचाराअंती अखेर मंगळवारी मंजुरी दिली. कळवा खाडीवर तिसरा उड्डाणपूल उभारण्याच्या कामास विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी स्थायी समितीने मंजुरी दिली होती. मात्र, कळवा खाडीतील खारफुटीच्या विस्तीर्ण अशा जंगलांना धक्का लागणार असल्याने हा उड्डाणपूल पर्यावरण विभागाच्या कात्रीत सापडला होता. महापालिकेने खारफुटीच्या पुनरेपणाचा सविस्तर अहवाल सादर केल्यानंतर या प्रस्तावित पुलाच्या कामास अखेर मान्यता देण्यात आली.
कळवा खाडीवर सद्य:स्थितीत दोन उड्डाणपूल अस्तित्वात असले तरी कोंडीमुक्त वाहतुकीसाठी ते पुरेसे नाहीत. या पुलावरून ठाणे-कळवा-मुंब्रा अशी वाहतूक होत असते. त्याशिवाय ठाणे-बेलापूर रस्त्यामार्गे नवी मुंबईतून ये-जा करणाऱ्या वाहनांचा भारही या पुलावर पडत असतो. ही गर्दी लक्षात घेता ठाणे-नवी मुंबई हा प्रवास ऐरोली खाडी पुलावरून करण्याकडे अनेक वाहनचालकांचा कल असतो. मात्र, या प्रवासासाठी ऐरोली आणि मुलुंड अशा दोन्ही ठिकाणी टोल भरावा लागत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर होता. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेने कळवा खाडीवर नवा पूल उभारण्याचा निर्णय घेतला असून या नियोजित पुलावर कोणत्याही स्वरूपाचा टोल आकारला जाणार नाही, असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.