कळवा

ठाण्याच्या खाडीपलीकडे विस्तारलेल्या कळव्याला काही वर्षांपासून विकासाचा मार्ग सापडला आहे. ठाणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असले तरी या उपनगराच्या विकासाकडे महापालिकेचे वर्षांनुवर्षे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या भागात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. कळव्याला विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभला आहे; मात्र येथील खारफुटी भराव टाकून ती गाडली जात आहे आणि बेकायदा वस्त्या उभारल्या जात आहेत. यासाठी सक्रिय असलेले माफिया मात्र मोकाट आहेत. काही वर्षांपासून या भागात सुसज्ज रस्ते, सुशोभित स्थानक, नवा खाडी पूल असे काही विकास प्रकल्प सुरू आहेत. याच भागात खाडीकिनारी सुसज्ज चौपाटी उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. तो यशस्वी झाल्यास कळव्यात राहणे किमान सुसह्य़ होऊ शकणार आहे.

आगरी-कोळ्यांची वस्ती

आगरी-कोळी रहिवाशांचा परिसर म्हणून कळवा-विटावा ओळखला जातो. या भागात आगरी-कोळी समाजाची संख्या मोठी असून राजकीय क्षेत्रातही त्यांचा दबदबा आहे. कळवा, मनीषानगर, सह्य़ाद्री, खारेगाव, पारसिकनगर, संघवी हिल्स येथे  कोकणातील नागरिक वास्तव्यास आहेत. तर पौंडपाडा, आतकोनेश्वरनगर व घोलाईनगरात उत्तर भारतीय आहेत.

बेकायदा बांधकामांचे शहर

खाडीकिनारी, वन आणि सरकारी जमिनींवर कळव्यात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे झालेली आढळतात. कळवा प्रभाग समितीच्या हद्दीत विटावा, भोलानगर, आनंदनगर, गणपती पाडा, पारसिक, संघवी हिल्स, सह्य़ाद्री, खारेगाव, मनीषा नगर, जानकी नगर, पौंडपाडा, आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, वसई कॉलनी, अपर्णाराज सोसायटी आणि कोकनेश्वर सोसायटी हे परिसर येतात. या भागांत कचरा, पाणी, वाहतूक अशा मूलभूत समस्या आजही नागरिकांना भेडसावत आहेत. घोलाई नगर, पौडपाडा, आतकोनेश्वरनगर हे परिसर डोंगरावर वसलेले असल्याने या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. नवी मुंबई शहराच्या सीमेवर वसल्याने वाहतुकीच्या दृष्टीने उपनगराला महत्त्व आहे. पुणे, नवी मुंबई आणि पनवेलसाठी कळवा शहरातूनच जावे लागते. शहरातील रस्त्यांच्या तुलनेत मात्र वाहनांचा आकडा मोठा असल्याने कळवा ते विटावा भागात वाहतूक कोंडी होते.

kalwa-chart

कचरा समस्या

विटावा, भोलानगर, आनंदनगर, गणपतीपाडय़ात जागोजागी कचरा, राडारोडा पडलेले असतो. त्यातुलनेत पारसिक, खारेगाव आनंद विहार, मनीषा नगर, सह्य़ाद्री सोसायटी, सुदामा या भागात कचऱ्याची समस्या थोडय़ाफार प्रमाणात जाणवते.

वाहतूक कोंडी

ब्रिटिशकालीन पुलाचे आयुर्मान संपल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कळवा-विटावामार्गे एकाच पुलावरून वाहतूक सुरू असून या पुलावर वाहनांचा भार वाढल्याने मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.

दफनभूमी समस्या

कळवा प्रभाग समितीत दफनभूमीची समस्या मोठी आहे. येथील ख्रिश्चन आणि मुस्लीम बांधवांनात्यासाठी थेट मुंब्रा गाठावे लागते. कळवा रेल्वे रुळाच्या पलीकडे व भोलानगर परिसरात पायाभूत सुविधांचा वानवा आहे. टीएमटीच्या बसगाडय़ांची येथ उपलब्धता नाही.

भोलानगर, आनंदनगर, न्यू शिवाजीनगर, वाघोबानगर येथे सार्वजनिक शौचालय नाही. रेल्वे रूळ असणाऱ्या या प्रभागामध्ये आजही नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करावा लागतो.

सोनिया जोशी, कार्यकर्त्यां

नगरसेवकांनी त्यांची कामे आता सुरू केली आहेत. पारसिक भागात राबविण्यात येत असलेला मलनिस्सारण प्रकल्पामुळे दरुगधीची समस्या निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

योगेश चव्हाण, पारसिक, कळवा

झोपडपट्टीचे पुनर्वसन, शौचालय, उद्यान, पिण्याचे पाणी, दळण-वळण, महिलांची सुरक्षा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न अशी स्थिती कळव्यातील विविध प्रभागांमध्ये आहे.

शेखर शांताराम मोरे, कळवा