कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे मागील तीन वर्षांत विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धावर प्रशासनाने १ कोटी ५८ लाख २८ हजार २९७ रुपये खर्च केले आहेत. या खर्चाचे कोणतेही विवरण प्रशासनाकडे नाही. स्पर्धातील खेळांची संख्या वाढीव होती त्यावेळी खर्च कमी होता आणि खेळांची संख्या कमी झाली तसा खर्च मात्र दामदुप्पट झाला असल्याचे पालिकेच्या कागदपत्रातून स्पष्ट झाले आहे.
२०१२-१३ या वर्षांत घेण्यात आलेल्या सहा क्रीडा स्पर्धावर प्रशासनाने २० लाख ४७ हजार २२ रुपये खर्च केले आहेत. २०१३-१४ या वर्षांतील चार क्रीडा स्पर्धावर ६४ लाख ५२ हजार ५७५ रुपये खर्च करण्यात आले आहेत. चालू वर्षी फक्त तीन स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. या स्पर्धावर तब्बल ७३ लाख ७१ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी या स्पर्धावर झालेल्या खर्चाची माहिती मागवली होती. पहिल्या वर्षी स्पर्धेसाठी २ ते ४ लाखा दरम्यान असलेला खर्च दुसऱ्या वर्षी १६ लाख ते ३४ लाखांपर्यंत नेण्यात आला. तिसऱ्या वर्षी हा खर्च १९ ते २८ लाखांपर्यंत पोहचविण्यात आला.
महापौर लेझीम स्पर्धा, महापौर क्रिकेट स्पर्धा, मल्लखांब, भिंती चित्र, हॅन्डबॉल, मॅरेथॉन, शरीरसौष्ठव, लंगडी, सायक्लोथॉन स्पर्धावर ही उधळपट्टी करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाची एका सुज्ञ नागरिकाने नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव, क्रीडा, वित्त विभागाचे सचिव यांच्याकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेच्या क्रीडा विभागाचे प्रमुख राजेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व स्पर्धा घेण्यात येतात. भगत यांच्या कारभाराविषयी नगरसेवकांनी यापूर्वीही तक्रारी नोंदविल्या आहेत. महापालिका संघातून कुस्ती खेळणाऱ्या सापर्डे गावातील एका तरुणाला एका कुस्तीपटूने पराभूत केले होते. पालिका संघातून खेळणारा कुस्तीपटू वस्ताद आहे. त्याने अनेक कुस्त्या मारल्या आहेत. या वस्तादाला पराभूत करणारा कुस्तीपटू हा खोटय़ा वयाचा दाखल देऊन अन्य संघात खेळला आहे. त्याच्यावर कारवाई करण्याची तक्रार सापर्डे गावातील कुस्तीपटूने पालिकेत केली आहे. पण आपल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

‘गडबड नाही’
महापालिका स्पर्धावर झालेल्या खर्चाविषयी लेखा विभागातील अधिकाऱ्याने सांगितले, की या स्पर्धाचे नियोजन, तेथील खर्च सर्व संबंधित विभाग करतो. लेखा विभागाशी त्याचा कोणताही थेट संबंध नाही. क्रीडा अधिकारी राजेश भगत यांनी सांगितले, क्रीडा स्पर्धाच्या खर्चाला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. या स्पर्धाच्या खर्चाचे सगळे विवरण आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणतीही गडबड नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भगवान मंडलिक, कल्याण</strong>