राज्यात युतीचे सरकार असतानाही भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करत कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवा आणि भाजपला अद्दल घडवा, अशी एकमुखी मागणी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्यापुढे केल्याने युतीत पुन्हा विसंवादाचे सूर उमटू लागले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यावर सत्तेत आलेल्या भाजपच्या नेत्यांना सत्तेची धुंदी चढली आहे. कल्याणात ही धुंदी उतरवू, असे आव्हानही यावेळी शिवसेनेच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपला दिले. यावेळी उपस्थित असलेले पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी मात्र सबुरीने घ्या, असा सल्ला स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिला. युती संबंधीचा निर्णय मातोश्रीवर घेतला जाईल आणि तुमच्या भावना पोहचविल्या जातील, असे िशदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच झाला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने डोंबिवली तसेच कल्याण पश्चिमेत शिवसेनेला धक्का दिला. शहरांमध्ये शिवसेनेची चांगली बांधणी असूनही विधानसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचे तोंड पहावे लागले. या पाश्र्वभूमीवर महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढविता येतील का, यासंबंधीची चाचपणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सुरू केली आहे.
महापालिकेत आयएएस अधिकारी आणण्यास शिवसेनेचा विरोध होता. त्यामुळेच रामनाथ सोनवणे आणि मधुकर अर्दड यांना साथ देण्याची रणनीती शिवसेना नेत्यांनी अवलंबली होती. त्यामुळे अर्दड यांच्या बदलीचा मुद्दा प्रतिष्ठेचा करत भाजपने शिवसेनेवर कुरघोडी केली. त्यामुळे या दोन्ही पक्षात विसंवादाचे वारे वाहू लागले आहे. डोंबिवलीतील अनेक जागांवर भाजपचे नेते दावा सांगतील हे लक्षात आल्याने शिवसेनेने दबावाचे राजकारण सुरू केले. या राजकारणाचा भाग म्हणून नुकत्याच झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी युती नको, असा सूर लावला. राज्यातील सत्तेत शिवसेनेला सन्मानाची वागणूक मिळत नसेल तर कल्याणात भाजपला जागा दाखवून द्यावी, असा सूर यावेळी शिवसेनेच्या काही नेत्यांनी लावला.