कल्याण-डोंबिवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात यंदा पाऊस कमी झाल्याने ३५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. महापालिका क्षेत्रात दोन दिवस पाणी कपात करण्यात येणार असल्याचे मंडळाचे कार्यकारी अभियंता शंकर जगताप यांनी सांगितले. ही पाणी कपात येत्या काही दिवसांत शहरात लागू होणार आहे.
लघु पाठबंधारे विभाग व औद्योगिक विकास महामंडळ यांची नुकतीच एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने पाणी कपातीत वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी जानेवारीपासून २० टक्के पाणी कपात केली जात होती. मात्र, यंदा ऑक्टोबर महिन्यापासूनच पाणी कपात लागू करण्यात आली आहे. सध्या उल्हास नदीतून पाणी उपसा सुरु असल्याने बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जात नाही. त्यामुळे ज्या दिवशी नदीचा फ्लो बंद होईल त्या दिवशी पाणी कपात सुरु करण्यात येईल असे संकेत महामंडळाने दिले आहेत. पुढील १५ जुलै पर्यंत पाणी पुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी आतापासून ३५ टक्के पाणी कपात करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.