ई. रवींद्रन यांना महापौरांचा पाठिंबा

निष्क्रिय म्हणून ठपका ठेवलेले कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांची तडकाफडकी बदली केली. या बदलीविषयी शहरवासीय समाधान व्यक्त करीत आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मात्र मुख्यमंत्र्यांना तातडीचे पत्र लिहून रवींद्रन यांचाच कैवार घेतला आहे.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत स्मार्ट सिटीचे विकास आराखडे तयार करण्यात आले आहेत. रवींद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली ते तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे ही विकासकामे राबविण्यासाठी त्यांची शहरात गरज असताना अचानक त्यांची बदली करण्यात आल्याने पालिकेने हाती घेतलेल्या कामांवर त्याचा परिणाम होणार आहे, असे महापौर देवळेकर यांनी पत्रात म्हटले आहे.

शिवसेनेने पालिका निवडणुकीत दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी आयुक्त रवींद्रन यांनी नियोजन केले होते.या कामांना अलीकडे प्रारंभ करण्यात येणार होता. त्यात त्यांची बदली करण्यात आल्याने विकासकामांवर परिणाम होणार आहे. शासनाकडून वेळेवर पुरेसे अनुदान मिळत नाही. त्यात जुळवाजुळव करून पालिका हद्दीतील विकासकामे हाती घेण्यात येण्यात आली आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील आयुक्ताची किमान तीन वर्षे सेवा पालिकेत झाली पाहिजे, पण तत्पूर्वीच रवींद्रन यांना उचलल्याने महापौर देवळेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसेनेला झुकते माप?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडोंमपा निवडणुकीपूर्वी शहरवासीयांना दिलेली विकासाची आश्वासने मर्जीतील आयएएस दर्जाचा अधिकारी पूर्ण करेल, असे स्पष्ट केले होते. यासाठी रवींद्रन यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शब्दावरून रवींद्रन यांची सिंधुदुर्गवरून कडोंमपात नियुक्ती केली. सुरुवातीला त्यांनी सर्वागीण शहर विकासाचे धोरण समोर ठेवले. नंतर ते सेना, भाजप अशा पक्षीय राजकारणात ते अडकत गेले. सेनेची कामे करायची. भाजपच्या नगरसेवकाला नोटिसा पाठवायच्या. असे प्रकार त्यांच्याकडून वाढले होते. हा भेदाभेद मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहचविण्यात भाजपचे शहरातील खबरे यशस्वी झाले होते. रवींद्रन यांची कार्यपद्धती फक्त सेनेला अनुकूल राहिली तर येत्या दोन वर्षांनी पुन्हा भाजपला त्याचे चटके बसतील, असा विचार रवींद्रन यांच्या बदलीमागे करण्यात आल्याची माहिती एका विश्वसनीय सूत्रांनी दिली.