भाजप आणि मनसेसाठी नवे दालन; मजूर संस्थांचे चांगभले

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांची धामधूम संपताच नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या दालनांवर गेल्याच वर्षी लाखो रुपयांची दौलतजादा करण्यात आली होती. असे असताना आता पुन्हा भाजप आणि मनसे पदाधिकाऱ्यांच्या दालनांचे विस्तारीकरण हाती घेण्यात आल्यामुळे महापालिका वर्तुळात आश्र्चय व्यक्त केले जात आहे. ही दालने पक्ष नेत्यांना तोकडी पडत असल्याचे कारण त्यामागे देण्यात आले आहे. त्यामुळे या दालनांचे स्थलांतर करून ती सुसज्ज करण्यासाठी नव्याने काम हाती घेण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय शिस्तीचे कितीही गोडवे गायले जात असले तरी जमा-खर्चाचे गणित जमविताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. त्यामुळे विकासकामे करण्यास महापालिकेजवळ पुरेसा पैसा नसल्याची तक्रार सातत्याने होत आहे. अत्यावश्यक असतील तेवढीच कामे मंजूर करण्याचे आदेश आयुक्त ई. रवींद्रन यांनी त्यामुळेच खातेप्रमुखांना दिले आहेत. अशा परिस्थितीत भाजप आणि मनसे पदाधिकाऱ्यांची दालने दुरुस्त करण्यासाठी पालिका तिजोरीतून सुरू असलेल्या दौलतजादा पाहून महापालिका वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, नव्या बदलांनुसार भाजपचे कार्यालय सचिव कार्यालयासमोरील जागेत आणण्यात येणार आहे. सचिव कार्यालयासमोरील ऐसपैस जागेचे नवेकोरे फर्निचर काढून टाकण्यात आले आहे. त्या जागी आता भाजप गटनेत्याचे आतल्या दालनासह प्रशस्त कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. मनसेचे पहिल्या माळ्यावरील दालन तळमजल्याला काँग्रेस गटनेत्यांच्या दालनात आणण्यात येणार आहे. काँग्रेसचा कोणताही अंश आपल्या दालनात नको म्हणून काँग्रेसच्या पूर्वीच्या दालनाच्या फर्निचरची पूर्ण मोडतोड करण्यात आली आहे. त्या जागी आता नवेकोरे  दालन सुरू येणार आहे.

राजकीय पक्षाची मिलीभगत

महापालिका मुख्यालयात पदाधिकारी बसत असलेल्या पहिल्या माळ्यावर मनसे व भाजप गटनेत्यांची कार्यालये आहेत. गेल्या वर्षी पालिका निवडणुका झाल्यावर या कार्यालयाची डागडुजी झाली होती.  ही कामे नेहमीच वादग्रस्त ठरत असलेले मजूर संस्थांचे काही विश्वस्त करतात.  त्यामुळे अशा कामांमधून मलई काढता येत असल्याने ही कामे विनावाद, विनाचर्चा मंजूर होतात. त्यामुळे राजकीय पदाधिकारी याविषयी  गुपचिळी बाळगतात.

भाजप नगरसेवकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांची विस्तारित कार्यालयाची मागणी होती. म्हणून त्यांना प्रशस्त कार्यालय करून देण्यात येत आहे. तशीच मागणी मनसे नगरसेवकांकडून करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना तळमजल्याला काँग्रेसचे कार्यालय असलेल्या जागेत सुसज्ज दालन उभारून देण्यात येत आहे. उपलब्ध बांधकाम साहित्यामधून हे करण्यात येत आहे. त्यामुळे खूप खर्च वगैरे प्रश्न येथे नाही.  – प्रमोद कुलकर्णी, शहर अभियंता, कडोंमपा.