७० वर्षांपासूनची खदखद बाहेर; ‘रास्ता रोको’दरम्यान जाळपोळ, दगडफेक

स्वातंत्र्यपूर्वकाळात विमानतळासाठी घेतली गेलेली जागा पुन्हा शेतकऱ्यांना परत करा, या मागणीचा आग्रह धरत अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील नेवाळी परिसरातील शेतकऱ्यांनी गुरुवारी हिंसक आंदोलन केले. महामार्गावरील वाहतूक रोखण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी वाहनांची तोडफोड तसेच जाळपोळ केली तसेच त्यांना रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे हा हिंसाचाराचा पूर्वनियोजित कट होता, असा संशय पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या आंदोलनाचा मोठा फटका कल्याण-कर्जत मार्गावरील वाहतुकीलाही बसला.

दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी ब्रिटिशांनी भाल, द्वारली, आडिवली आणि नेवाळी या भागांतील १६७६ एकर जमीन घेतली होती. त्यासाठी जमीनमालकांना नुकसानभरपाईही देण्यात आली होती. ब्रिटिशांचा अंमल संपल्यानंतर ही जागा भारताच्या संरक्षण विभागाकडे आली. तेव्हापासून आतापर्यंत या ठिकाणी कोणतीही शासकीय योजना वा प्रकल्प उभा राहू शकला नाही. या काळात तेथील अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन कसणे सुरूच ठेवले होते. काही वर्षांपूर्वी ही जमीन नौदलाच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर नौदलाने दोन वर्षांपूर्वी जमिनीचे मोजमाप केले, तसेच काही महिन्यांपासून आपल्या ताब्यातील जमिनीभोवतील संरक्षक भिंत उभारण्यास सुरुवात केली. याला शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला नाही; परंतु पावसाळा सुरू होताच शेतकऱ्यांनी ‘आपल्या’ जमिनींवर शेतीची कामे सुरू केल्यानंतर नौदलाकडून त्याला अटकाव करण्यात आला. यानंतर शेतकऱ्यांच्या मनातील खदखद बाहेर पडली.

‘आम्हाला आमच्या जागेवर शेती करू द्यावी,’ अशी मागणी करत शेतकऱ्यांच्या नेवाळी संघर्ष समितीने काटई नाका ते कर्जत महामार्गावर गुरुवारी ‘रास्तारोको’ करण्याचे जाहीर केले होते. यासंदर्भात स्थानिक पोलीस ठाण्याला पत्रही देण्यात आले होते; परंतु गुरुवारी पहाटे सुरू झालेल्या या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले. आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांनी वाहनांचे टायर टाकून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या तसेच काही गाडय़ा पेटवून देण्यात आल्या. आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांवरही हल्ला केला.

परिस्थिती चिघळल्याचे पाहून घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस फौजफाटय़ावर हल्ला करण्यात आला. आंदोलकांच्या दगडफेकीत साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पाटील तसेच हिललाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह १२ पोलीस जखमी झाले. पोलिसांनी प्रत्युत्तरात रबरी गोळ्यांनिशी केलेल्या गाोळीबारात काही आंदोलकही जखमी झाले. आंदोलकांमध्ये महिला व अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याने पोलिसांकडून संयमाची भूमिका घेण्यात येत होती; परंतु याचा गैरफायदा घेत आंदोलन आणखी भडकवण्यात आले. डावल पाडा येथे पोलिसांच्या तीन गाडय़ा पेटवण्यात आल्या. इतर खासगी ट्रक आणि वाहनांच्या हवा काढून काचा फोडण्यात आल्या. एकूण परिस्थिती पाहून सकाळी ११ च्या सुमारास राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल, पोलीस परिमंडळ चारचे आठही पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी असा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला. त्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली.

सातबारावर नौदलाचे नाव

संरक्षण मंत्रालयाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कमांडर राहुल सिन्हा यांनी ही जमीन संरक्षण विभाग आणि भारतीय नौदलाच्या मालकीची असून तसा सातबाराही असल्याचे त्यांनी सांगितले. अतिक्रमण रोखण्यासाठी नौदलाकडून येथे संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असून याबाबतची सर्व माहिती राज्य शासनाकडे आहे. तसेच या बांधकामासाठी स्थानिक पोलीस प्रशासन आणि पोलिसांकडून संरक्षण मिळत असल्याचे नमूद केले आहे.