काश्मीर भाजप महिला मोर्चा आघाडीच्या हिना भट यांचे वसईत प्रतिपादन

‘आपले शेजारी काश्मीर अशांत करण्याचा आणि काश्मीर हा भारताचा अंग नसल्याचा कांगावा सतत करत असतात. पण त्यांना हे माहीत नाही की, काश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे,’ असे प्रतिपादन काश्मीर भाजप महिला मोर्चा आघाडीच्या डॉ. हीना भट यांनी भाजप वसई रोड शहर शाखेतर्फे आयोजित ‘ओणम’ व ‘दिवाळी स्नेहमीलन’ उत्सवात केले.

भारतीय जनता पार्टी वसई रोड शहर शाखेच्या वतीने दक्षिणेतील महत्त्वाचा सण ‘ओणम’ व दिवाळी सणांच्या पाश्र्वभूमीवर वसई रोड पश्चिम येथील साईनगर भागात असलेल्या महानगरपालिकेच्या रंगमंचावर स्नेहमीलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी पालघर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंबरीश, खासदार चिंतामण वनगा, सायन कोळीवाडाचे आमदार तामिळ सेल्वम, माजी आमदार हेमेंद्र मेहता आदी दिग्गजांसह काश्मीर भाजप महिला मोर्चा आघाडीच्या डॉ. हीना भट व केरळ राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सी. के. पद्मनाभम यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी केरळ कुन्नूर येथील प्रसिद्ध नृत्यांगना तीर्था गणेश यांनी ‘गणेशवंदना’, ‘कुचीपुडी’ नृत्य सादर केले. ‘नाटय़ अकादमी’च्या हरतांजली नायर यांच्या ग्रुपने ‘भरतनाटय़म’ व ‘वंदेमातरम’ सादर केले. तर वसईतील विद्यार्थ्यांनी मराठी गीत व नृत्यांचे सादरीकरण केले.

या वेळी बोलताना खासदार वनगा यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांचा लेखाजोखा सर्वासमोर मांडला. तर गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंबरीश यांनी महाबलीचे राज्य हे सर्वासाठी होते. तसेच राज्य आपणही घडवू या, असे मत मांडले. पालकमंत्री विष्णू सवरा यांनी नरेंद्र मोदींच्या मनातील विकास पालघर जिल्ह्य़ात प्रत्यक्षात आणण्याची प्राथमिकता असल्याचे मत मांडले.

यावेळी वसईतील गणेश मंडळांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तर महिला शरीरसौष्ठवपटू मिताली नायर हिचा देखील सत्कार केला.