कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी अवघ्या मिनिटात पाच कोटी २४ लाख रुपयांचे प्रस्ताव चर्चेविना मंजूर केले. सभेची विषयपत्रिका किमान तीन दिवस आधी जाहीर करणे आवश्यक असते; परंतु सोमवारी रात्री उशिरा या सभेची विषयपत्रिका स्थायी समिती सदस्यांच्या घरी पोहोचविण्यात आल्याची माहिती आहे.  
आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी विकासकामांसाठी ठरवण्यात आलेली रक्कम खर्च करावी, असा दबाव नगरसेवकांकडून वाढू लागला आहे. ही कामे वर्षभरात टप्प्याटप्प्याने उरकणे आवश्यक असताना आर्थिक वर्षांच्या अखेरीस सुमारे पाच कोटी रुपयांची कामे स्थायी समितीच्या मंजुरीसाठी आणण्यात आली. यासाठी अंतिम क्षणी विषयपत्रिका काढण्यात आली. सोमवारी रात्री ती स्थायी समिती सदस्यांच्या घरी पोहोचविण्यात आली. ही घाई कशासाठी, असे
प्रश्न काही सदस्यांनी केल्यावर ‘फक्त सभेला हजेरी लावा’ एवढेच सांगण्यात आले.
कल्याणमधील पूर्व, पश्चिमेच्या अनेक भागांत पाणीटंचाई आहे. गेल्या महिनाभर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत कल्याण पूर्व भागातील पाणीटंचाईवरून नगरसेवकांनी गोंधळ घातला होता.

*गंभीर समस्या ओळखून स्थायी समितीने जलकुंभांवरून पुरवठय़ाच्या विभागवार वितरणासाठी ७४ लाख रुपयांचे प्रस्ताव मंजूर
*यात कैलासनगर, आंबेडकर नगर विभागासाठी ३२ लाख ३६ हजार, लोकग्राम विभागासाठी २३ लाख ८० हजार, कोळसेवाडी विभाग २७ लाख ७६ हजार मंजूर

आधारवाडी रहिवाशांचा श्वास कोंडला
आधारवाडी क्षेपणभूमीवरील (डम्पिंग ग्राऊंड) कचरा पेटविण्यात येतो. त्यामुळे परिसरातील रहिवाशांचा श्वास धुराने कोंडला आहे. क्षेपणभूमी बंद करा अन्यथा पेटवण्यात येणाऱ्या कचऱ्याचा बंदोबस्त करा, अशी मागणी करत या भागातील नागरिकांनी पालिकेवर मोर्चा आणला होता. नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी आधारवाडी क्षेपणभूमीवरील कचऱ्याचे सपाटीकरण करण्याचा प्रस्ताव सभेत मंजूर करण्यात आला. या कामासाठी बुलडोझर, जेसीबी दोन वर्षे भाडय़ाने घेण्याचे ठरले. हा प्रस्ताव आयुक्तांकडून येणे आवश्यक होता, असा प्रश्न सदस्य मनोज घरत, वामन म्हात्रे यांनी उपस्थित केला. यांसारखे महत्त्वाचे प्रस्ताव सभागृहात चर्चेसाठी असताना मिनिटातच पाच कोटींच्या या प्रस्तावांना मंजुरी दिली जाते, यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.