महापालिका मुख्यालयाजवळील शिवाजी चौकात एका गाळ्याचे बेकायदा बांधकाम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या बांधकामाला काही महापालिका अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे हे बेकायदा बांधकाम पाडण्यात अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे, अशी तक्रार आयुक्तांकडे करण्यात आल्यानंतर आयुक्त ई. रवींद्रन यांनी तातडीने हे बेकायदा बांधकाम तोडण्याचे आदेश दिले.
‘क’ प्रभागाच्या अंतर्गत असलेल्या शिवाजी चौकात बांधकामाचे सगळे नियम झुगारून एक गाळा बांधण्यात येत आहे. या गाळ्याच्या ठिकाणी एक केशकर्तनालय होते. ही टपरी तोडून त्या ठिकाणी ताडपत्र्या लावून बंदिस्तपणे गाळा उभारण्यात आला. बाजारभावाप्रमाणे या गाळ्याची किंमत सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंत आहे. अशा बेकायदा बांधकामांना पालिका अधिकारी संरक्षण देत असल्याची तक्रार एका माजी नगरसेवकाने आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेऊन हा बेकायदा गाळा पाडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या गाळ्याच्या बाजूला गेल्या काही दिवसापूर्वी एका प्रसिद्ध कापड दुकानाचे वाढीव बेकायदा बांधकाम तोडण्यात आले होते. या दुकानाच्या बाजूला एक जिना आहे. तोही बेकायदा असून, त्याच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. शहराशी घट्ट नाळ असणाऱ्या एका माजी आयुक्ताने या जिन्याला बांधकाम परवानगी दिली असल्याने कागदपत्रांवरून उघड झाले आहे.