एकाच मालमत्तेवर सूट; कडोंमपाच्या आठ वर्षांपूर्वीच्या ठरावावर निर्णय
शासनाच्या नगरविकास विभागाने माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसेच, संरक्षण दलात सवरेत्कृष्ट कामगिरी करताना शौर्य पदक मिळविणाऱ्या लष्करी कर्मचारी, अधिकाऱ्यांना मालमत्ताकरात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील सुमारे चार ते पाच हजार निवृत्त लष्करी कर्मचारी, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना या सवलतीचा लाभ मिळणार आहे.
आठ वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली पालिकेने देशाच्या सीमेवर प्राणपणाला लावून सीमेचे रक्षण केलेल्या निवृत्त सैनिक, लष्करी अधिकाऱ्यांना मालमत्ताकरात सूट देण्याचा निर्णय घेतला होता. देशाची संरक्षण दलाच्या माध्यमातून सेवा करणारे सैनिक निवृत्तीनंतर आपल्या मूळ गावी किंवा शहरी भागात वास्तव्याला येतात. कडोंमपा हद्दीत असे सुमारे चार ते पाच हजार निवृत्त सैनिक असल्याची चर्चा त्यावेळी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाली होती. माजी सैनिकांना मालमत्ताकरात सवलत देण्याच्या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्वसाधारण सभेने प्रशासनाला दिले होते.परंतु कायद्यात अशी तरतूद नसल्याने माजी सैनिकांसाठी ठराव होऊनही त्याचा लाभ घेता येत नव्हता. माजी सैनिकांच्या काही संघटनानी शासनाकडे माजी सैनिकांच्या पालिका हद्दीतील मालमत्तांना करात सूट व ग्रामीण हद्दीतील मालमत्ता कर माफ करण्याची मागणी केली होती. मंगळवारी अखेर त्याला मान्यता देण्यात आली आहे.