दीपेश म्हात्रे यांच्याकडे कल्याण-डोंबिवलीचा पदभार सोपविण्यासाठी शिवसेनेत हालचाली

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही नागरी विकासाची कामे प्रभावीपणे मार्गी लावली जात नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. यामुळे पक्ष नेतृत्व विद्यमान महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यावर कमालीचे नाराज असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. वाढती लाचखोरी, अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, फेरीवाल्यांसारखा किरकोळ प्रश्न सोडविण्यात सत्ताधारी पक्षाला येत असलेले अपयश येत आहे. त्यामुळे येत्या काळात नेतृत्वबदलाचा विचार वरिष्ठ स्तरावरून सुरू असून शिवसेनेचे युवा पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्याकडे महापौरपद सोपविण्याच्या जोरदार हालचाली वरिष्ठ स्तरावर सुरू आहेत.

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर  दीपेश म्हात्रे हे वडिलांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्यासोबत असलेला घरोबा त्यास कारणीभूत ठरेल असेही बोलले जात होते. मात्र, पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी जोर लावत संभाव्य फूट टाळली. ही फूट टाळताना या  दीपेश यांना पालिकेतील सर्वोच्च पद दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. आता नेतृत्वबदलाच्या चर्चेत या नेत्याचे नाव पुन्हा एकदा आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

महापौरपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांंचा आहे. महापौर देवळेकर यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. पुढील सहा महिने नवीन महापौर बसविण्याचा सेनेच्या गटात विचार सुरू आहे.

पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र आम्ही रस्त्यावरचे फेरीवाले हटवू शकत नाही तर असल्या सत्तेला अर्थ उरत नाही. त्यामुळे पालिकेत बदलांची चर्चा सुरू आहे. पण आपल्यापर्यंत अद्याप तसे काही व तसा प्रस्ताव आलेला नाही. आल्यावर नक्की विचार करेन, असे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

देवळेकरांना भार सोसवेना

एक अभ्यासू आणि ज्येष्ठ नगरसेवक म्हणून शिवसेनेत विद्यमान महापौर राजेंद्र देवळेकर यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात कल्याण डोंबिवलीत ठोस विकासकामांची आखणी होईल, असे अनेकांना वाटले होते. मात्र, काही महिन्यांपासून त्यांची महापालिकेच्या कामकाजावरील पकड ढिली झाल्याची चर्चा खुद्द शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये आहे. सत्ताधारी म्हणून शिवसेनेचा प्रशासनावर अजिबात अंकुश राहिलेला नाही. विकास कामे ठप्प  आहेत. कचऱ्याचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लागलेला नाही. शिवसेनाप्रमुखांचे भव्य स्मारक सोडले तर शहरात नागरी विकासाचे एकही काम गेल्या दोन वर्षांत पूर्ण झाले नाही. फेरीवाले, पालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यातील लागेबांधे नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत.

नेतृत्वबदलाविषयी मागील वर्षभर विचार सुरू आहे. नावे पण निश्चित करण्यात आली आहेत. नेतृत्वबदलाचा विचार वरिष्ठांकडून योग्य वेळी होईल.

गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख, कल्याण

नेतृत्व बदल होतीलच. तसेच जोरदार प्रयत्न सुरू आहेत, पण मी माझे काम निष्ठावान शिवसैनिक करीत राहीन.

राजेंद्र देवळेकर, महापौर