X

कल्याण खाडीवर ‘साबरमती’

दुर्गाडी किल्ला ते पत्रीपूलदरम्यानच्या उल्हास खाडी किनाऱ्याचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय

गुजरातच्या धर्तीवर खाडी किनाऱ्याचा पर्यटन विकास; जिल्हा प्रशासनाकडून पालिकेला एक कोटीचा निधी

प्रशस्त किनारा, त्यावरील बगिचा, बसण्यासाठी आसने, विरंगुळय़ासाठी विविध साधने, आकर्षक रोषणाई अशा रचनेमुळे देशभरातील नव्हे तर परदेशातील पर्यटकांचेही आकर्षण स्थळ असलेल्या गुजरातमधील साबरमती नदीच्या किनाऱ्याचा अनुभव कल्याण-डोंबिवलीकरांना त्यांच्याच शहरात घेता येणार आहे. कल्याणमधील दुर्गाडी किल्ला ते पत्रीपूलदरम्यानच्या उल्हास खाडी किनाऱ्याचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी घेतला आहे. ‘साबरमती रिव्हरफ्रंट’च्या धर्तीवर कल्याण खाडी किनाऱ्याचा विकास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पालिकेला एक कोटी रुपयांचा निधी देऊ केला असून महाराष्ट्र सागरी मंडळानेही याकामी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पालिका आयुक्तांनी कल्याण खाडी तसेच डोंबिवली रेतीबंदर खाडी किनाऱ्याचा ‘विस्तृत प्रकल्प अहवाल’ सादर करण्याचे आदेश अभियंता विभागाला दिले आहेत.

कल्याण आणि डोंबिवलीतील खाडी किनाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून रेती व्यावसायिक व वाळूतस्करांनी विळखा घातला होता. या ठिकाणी होणाऱ्या बेकायदा रेतीउपशामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत होती. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सहा महिन्यांपूर्वी कल्याणमधील दुर्गाडी, बाजारपेठ खाडी किनाऱ्यावरील रेतीमाफियांचे अड्डे उद्ध्वस्त केले. अशीच कारवाई डोंबिवली खाडी किनारीही करण्यात आली.

दुर्गाडी किल्ला ते पत्रीपुलादरम्यानचा खाडी किनारा आता  मोकळा झाला आहे. मात्र, या ठिकाणी रेतीमाफिया पुन्हा सक्रिय होऊ नये, यासाठी पालिकेने या किनाऱ्यांचा पर्यटन विकास करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाला केल्या असून त्यासाठी एक कोटीचा निधी देण्याचेही कबूल केले आहे.

त्यानुसार आता पालिका आयुक्तांनी अभियंता विभागाला या प्रकल्पाचा विस्तृत अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

आयुक्त पी. वेलरासू यांनी डोंबिवली खाडी किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत.

किनाऱ्याच्या जमिनीची मालकी सागरी मंडळाची असेल त्यावर फक्त पालिका सुशोभीकरण करणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळणारा निधी, स्मार्ट सिटी निधीतून खाडी सौंदर्यीकरणाची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत, असे पालिकेचे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी या वेळी सांगितले.

प्रकल्प असा..

* दुर्गाडी ते पत्रीपुलादरम्यानच्या दीड किलोमीटरच्या पट्टय़ात हे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. अशाच पद्धतीने डोंबिवली रेतीबंदर खाडी किनाऱ्याचा काही भाग विकसित करण्यात येणार आहे.

* गुजरातमधील ‘साबरमती रिव्हरफ्रंट’प्रमाणे खाडी किनाऱ्यांचे सपाटीकरण करून तेथे उद्याने, बगिचे, चौपाटी विकसित करण्यात येणार आहे. या ठिकाणी मनोरंजन साधने व विरंगुळा केंद्रेही उभारण्यात येतील.

* २०२२ पर्यंत ३२ किमीचा खाडी किनारा विकसित करण्यासाठी ६५ कोटीचा खर्च प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात कल्याणचा २ किमी, डोंबिवलीचा सात किमीचा किनारा विकासाचा प्रस्ताव आहे.

कल्याण खाडी किनारा विकसित करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांबरोबर बैठका झाल्या आहेत. त्यांना या कामाचे विस्तृत प्रकल्प अहवाल तातडीने करण्याचे सूचित केले आहे. या कामात कोठेही हयगय नको म्हणून तातडीने जिल्हा महसूल विभागाकडून एक कोटीचा निधी उपलब्ध करून देणार आहोत. 

-डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी

खाडी किनारे आतापर्यंत बकाल झाले होते. वाळूमाफियांनी त्यांना घेरले होते. महसूल विभागाच्या कारवाईत या किनाऱ्यावरील अतिक्रमणे, गैरव्यवसाय बंद करण्यात आले आहेत. किनाऱ्याची जागा सागरी मंडळाच्या अखत्यारीत येते. या जागेची तातडीची गरज मंडळाला नाही. त्यामुळे कल्याण, डोंबिवली खाडी किनारच्या सागरी मंडळाच्या जमिनी पालिकेला सुशोभीकरणासाठी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल.

 – रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री, सागरी मंडळ

  • Tags: Ulhas creek shore,
  • Outbrain